मालवण
जोरदार पाऊस व वाऱ्याने मालवणला झोडपून काढले असून मालवणात मालवण शहरातील मेढा येथे बंदर जेटी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या प्रियेश लुगेरा यांच्या जागेतील गुलमोहरचे मोठे झाड आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे कोसळून मुख्य रस्त्यावर पडले. यामुळे वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला.
दरम्यान, हे झाड रस्त्यावर आडवे कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. झाडाचा काही भाग रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या कस्टम विभागाच्या जुन्या पडक्या इमारतीवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ संतोष शिरगावकर यांच्या जागेतील पत्र्याचे कंपाउंड तुटून नुकसान झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगरपालिका, महसूल विभाग आणि वीज वितरण विभागास या घटनेची माहिती दिली. यावेळी नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम प्रदीप वळंजू, सेवानिवृत्त कर्मचारी रमेश कोकरे, यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सुमेध जाधव, सचिन कासले, भूषण जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत झाड तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले होते. यावेळी सुदेश आचरेकर, संतोष शिरगावकर, प्रियेश लुगेरा आदी व इतर उपस्थित होते.