*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ अर्चना मायदेव लिखित अप्रतिम लेख*
*🌹मनभावन श्रावण🌹*
*श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे*
या कवितेच्या i प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद च घेऊन येतात.आपल्या हिंदू पंचांगात १२महिने काही ना काही सण असतातच.पण त्यातला श्रावण मास हा काही औरच आनंद घेऊन येत असतो.श्रावणात महिनाभर भरगच्च सण असतात. सगळीकडे आनंदाची, उत्साहाची अगदी धूम चाललेली असते. सोमवार शंकराचा उपवास,मंगळवार मंगला गौर असते.नवीन लग्न झालेल्या नव वधुंसाठी तर श्रावण म्हणजे पर्वणीच असते.बुध_बृहस्पति ची पूजा,शुक्रवारी जिवतीला पुरण पोळीचा नैवेद्य, शनिवारी मारुतीची उपासना,आणि सगळ्यात वेगळी पूजा असते ती रविवारी आदित्य_राणु बाई ची.या दिवशी पुरणाचा नैवेद्य असतो त्याला “रोट”म्हणतात.विदर्भात हा सण खूप उत्साहात साजरा होतो.
नंतर येते नाग पंचमी. ते हाताला मेंदी लावून बसणं,अंगणातल्या झाडावर झोका बांधून झालेलाच असतो. कुणी विरहिणी मनातल्या मनात आपल्या दूर देशी असलेल्या सजणाला बोलावत असते आपल्या गाण्यातून जसे ,*सावन के झुले पडे,तुम चले आओ,तुम चले आओ*. माहेर वाशिणींना माहेरून येणारं मूळ आठवत असतं.आता कधी जायला मिळेल माहेराला मनात विचार चाललेला असतो.पण लवकरच लगेचच राखी पौर्णिमा येते,आणि निमित्त मिळते माहेरी जाण्याचे किंवा भावाला आपल्या घरी बोलावण्या चे.मग बहीण म्हणते,”*आली पूनव राखीची,येतो भावाचा आठव,सुखी ठेव देवा त्याला,राखी बांधाया पाठव*.
नंतर येतो गोपाल कृष्ण,गोविंदा रे गोपाळा म्हणत सगळेच बाळ गोपाल,दहीहंडी फोडत गल्ली गल्लीतून फिरत असतात.कुठेतरी दूर वर गाण्याचे सूर कानावर येतात.”अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले”.दुसऱ्या दिवशी श्री गोपाल कृष्णाला दही काल्याचा नैवेद्य केला जातो.
हे सगळ झालं की आपल्या सगळ्यांचाच आवडता कृषीवलांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे *बैल पोळा*.शेतकऱ्यांचा मित्र,सखा,त्याचा सर्जा ,राजा शेतकरी म्हणतो,*आज हाये तुह्या मानाचा रं दिस,
कारभारीन देते तुला पुरण पोळीचा रे घास,
नाही देणार अंतर तुह्या गयाची रे आन,
बळी राजाच्या मैतराची येगळीच शान*
अशा प्रकारे पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून बैलांच्या प्रती असलेली सद्भावना प्रेम सगळे व्यक्त करतात ह्या दिवसाला पिठोरी अमावस्या म्हणतात.
अशा रीतीने माझा मनातला मन भावन श्रावण ,आपल्या श्रावण सरींनी सगळ्यांना आनंदात अगदी चिंब चिंब करून टाकतो, आणि मन पुन्हा पुढच्या श्रावणाची वाट बघत गणपतीच्या आगमनाच्या तयारीत दंग होते.
सौ अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
२/८/२२