You are currently viewing “पूजा वरदमहालक्ष्मीची”

“पूजा वरदमहालक्ष्मीची”

‘मेघनुश्री’ टोपण नावाने लिहिणाऱ्या कोल्हापूर येथील लेखिका कवयित्री श्रीम.मेघा कुलकर्णी यांचा लेख

राज्य वेगळे, भाषा वेगळी | परंपरेचा धागा एकच | चरांचरांतील चैतन्य दिसे | लक्ष्मीच्या आशीर्वाद रूपांतच||

कर्नाटक आणि दक्षिणेकडच्या राज्यांत ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हे अनेकांचे आराध्यदैवत आहे. इकडे
‘महालक्ष्मी-वेंकटेशा’ असाच शब्दप्रयोग केला जातो. महालक्ष्मीच्या दर्शनाची इथल्या लोकांना आस असते. प्रत्यक्ष महालक्ष्मीच्या दर्शनानंतर कोल्हापूरवासीय, आणि कोल्हापूरात मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीने, आणि सहकार्याने लोक भारावलेले असतात. आलेल्या त्या सुखद अनुभवाबद्दल ते भरभरून आम्हालाच सांगत असतात. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी इकडे दक्षिणेत ‘वरदमहालक्ष्मी’ची विशेष पूजा केली जाते. तीन वर्षांपूर्वी मी त्यानिमित्त लिहिलेले हे स्फुट. श्रावणातील शुक्रवारी महालक्ष्मीच्या पूजनाची प्रथा ही आपल्या परंपरेचाच एक भाग. पहिल्या शुक्रवारी श्री महालक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यातही श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार सर्वांत महत्वाचा मानला जातो. उत्तर कर्नाटक व संपूर्ण दक्षिणेकडे हा दिवस ‘वरदमहालक्ष्मी’ असा संबोधलं जातो. इथे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. श्रावण सुरु होताच वरदमहालक्ष्मी सणाच्या दिवसाची सर्वजण वाट पाहतात.
श्री महालक्ष्मीची कृपादृष्टी रहावी आणि सुखसमृद्धीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर सदैव असावा यासाठी या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर आराधना व पूजा यांचे आयोजन केले जाते. काही कुटुंबातून वर्षातून एकदा या दिवशी होमहवन केले जाते. पूजेसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येते. पहाटेपासून मोठमोठ्या रांगोळ्यांनी अंगण सजते. (शहरांत गल्ली-बोळ-रस्ते सजतात.) मंगल वाद्यांच्या गजरांत दिवसाची सुरुवात होते. घराचे मुख्य प्रवेशद्वार व सभोवतालचा परिसर केळीचे खांब व विविधरंगी फुलांच्या तोरणांनी सुशोभित केले जाते. सर्वजण नवे वस्त्र परिधान करतात. सकाळी सुरु झालेली पूजा दुपारचा नैवेद्यआरतीपर्यंत सुरू राहते. दक्षिणेकडे ओबट्टू (गूळ-खोबऱ्याच्या पोळ्या), उत्तर कर्नाटकात पुरणाचे कडबू आणि भजी असा बेत असतो.
संध्याकाळी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम होतो. घरांतील ज्येष्ठ महिला आरती-भजनांतून महालक्ष्मीची भक्तिसेवा करतात. जे खूपच श्रवणीय असते. सुवासिंनीना गजरे, हळद-कुंकू देऊन आपल्याकडच्या संक्रातीसारखी भेटवस्तू दिली जाते. इथल्या हळदी-कुंकूवाच्या प्रथेत थोडासा फरक आढळतो. आपण ते एकमेकींना लावतो, इकडे दक्षिण भारतात तबक फक्त समोर धरले जाते. हळद-कुंकू आपले आपणच लावून घ्यायचे. या तबकांत पान-सुपारी,लहान दोन केळी, अगदी छोट्या आकाराचे नारळ आणि ओटी साहित्य असलेली पिशवी, या पिशव्यांवर काही चित्रे आणि शुभेच्छा संदेश असतो. ती एक संध्याकाळ अत्यंत प्रसन्न वातावरणात साजरी होत असते.

मेघनुश्री, कोल्हापूर
मोबाईल : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा