You are currently viewing माझा देश आणि विविधता …

माझा देश आणि विविधता …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख*

*माझा देश आणि विविधता …*

जुनाच व खूप चघळलेला विषय आहे हा … तरी ही खूप
काही लिहावेसे वाटणारा व मातृभूमी विषयी कृतज्ञता
व्यक्त करण्याची उत्तम संधी देणारा हा विषय आहे.
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी”
माता आणि मातृभूमी यांचे स्थान स्वर्गाहून श्रेष्ठ आहे.
निश्चितच! या विषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण
नाही. अशा या मातृभूमी विषयी किती महान कवींनी किती
महान कविता केल्या हे आपण चांगलेच जाणून आहोत.

“ हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला हे चंद्र सूर्य तारे”

वाह वा.. माय भूमीच्या आरती साठी चंद्र सूर्य आणणाऱ्या
या सुरेश भटांच्या प्रतिभेचे काय वर्णन करावे? हे माते तू
तू इतकी महान आहेस की साक्षात चंद्र सूर्याच्या दिव्यांनी
तुला ओवाळावे, तुझी पुजा करावी असे मला वाटते. अत्यंत
हृदयातून निघालेल्या या ओळी मनाचा ठाव घेतात, याला
म्हणतात खरा देशभक्त ! चंद्र सूर्याच्या दिव्यांनी ओवाळणारा
हा माणूस खराखुरा प्रतिभावंत श्रीमंत होता व त्याची देशभक्ती
ही जाज्वल्य होती त्या शिवाय हृदयातून असे भाव उमटूच
शकत नाही. तर मंडळी …
अशी आहे आपली मातृभूमी …”सुजलाम सुफलाम
मलयजशीतलाम”
सश्य शामलाम मातरंम् .. मन कसे अभिमानाने भरून येते!
आणि “ वंदे मातरंम् म्हणतांना मस्तक आपोआप खाली
झुकते. खरोखर मातृभूमीवर प्रेम न करणारा करंटाच
असला पाहिजे. राष्ट्रगीत म्हणून इतकी वर्ष झाली पण
आज ही “जणगणमन “म्हणतांना माझा ऊर भरून आला नाही
असे कधी ही होत नाही, गळा भरून येतो व नकळत माझे
डोळे पाणावतात. कदाचित राष्ट्रप्रेमाचे बाळकडू प्याल्या
मुळे माझी अशी अवस्था होत असावी, नव्हे प्रत्येक
भारतीयाची अशीच अवस्था होत असावी याची मला खात्री
आहे.

“ गर्जा जयजयकार “ सारखी कुसुमाग्रजांसारख्या महान
कवींच्या लेखणीतून उतरलेल्या कवनांनी आज ही अंगावर
रोमांच उभे राहतात.खरंच आपल्या देशासारखा देश जगात
नाही. मराठीतील सर्व नामवंत कवींनी मातृभूमीचे गोडवे
गाईलेले आहेत.आणि आज ही देशभक्तीपर गीते तितक्याच
तन्मयतेने लिहिली जात आहेत कारण आपले आपल्या
मातृभूमीवरील जाज्वल्य प्रेम होय. अशा या विविधतेने
नटलेल्या देशाविषयी अपार श्रद्धा व भक्तिभाव समस्त
भारतीयांच्या मनात आहे या बद्दल ही शंका घेण्याचे कारण
नाही. प्रादेशिक कविंनी तर आपापल्या जन्मभूमीचे फारच
सुंदर वर्णन केले आहे. उदा. कवी बा.भ बोरकर . आपल्या
गोव्याच्या भूमीचे असे काही सुंदर वर्णन ते करतात की,
क्षणभर गोवा साक्षात नजरेसमोर उभा रहावा.

“माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या कपारी मधून
घट फुटती दुधाचे”

वाह वा .. किती समर्पक वर्णन आहे हो, चारच ओळीतून
गोवा डोळ्यांसमोर उभा रहावा! हे एक उदा. म्हणून मी तुम्हाला
देले. ही आपली मायभूमी काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत
अशीच विविधतेने नटलेली आहे. काश्मिर तर साक्षात स्वर्गभूमी, जिचा मोह कुणालाही पडावा अशीच.आणि दक्षिणेत केरळ कन्याकुमारी ! वाह वा ! नजरेचे पारणे फिटावे
या म्हणीचा साक्षात प्रत्यय देणारी भूमी..! तेथील नारळी
पाफळीच्या बागा , चहाचे मळे पाहून क्षणभर आपण स्वर्गात
तर नाही ना? असा संभ्रम निर्माण होतो. केरळ मध्ये तर कालव्यांचे असे काही जाळे आहे की , नावेतून सारे व्यवहार
येणे जाणे, नावेचे बस सारखे ठिकठिकाणी असलेले थांबे पाहून फारच मजा वाटते. सारे व्यवाहार रस्त्यावर बस चालावी
तसे पाण्यातून चालणाऱ्या नावेतून होतात. पाण्याशीच सतत
संपर्क असल्यामुळे लहान मुलांपासून सारेच कसे उत्तम पोहतात व आपल्याला ते पाहूनच नवलाई वाटते. माणूस ज्या
प्रदेशात व परिस्थितीत रहातो त्या नुसार सवयी लावून घेतो व
जीवन सुसह्य करून घेतो. किती चांगली गोष्ट आहे ही !

काश्मिरचे नैसर्गिक सौंदर्य एकिकडे तर आपल्या राजेमहाजांनी
निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचे सौंदर्य निराळे ! जगभरात कुठेही नाहीत असे किल्ले व राजवाडे आपल्या या देशात
आहेत आणि गतइतिहासाचे दाखले देत ते शेकडो वर्ष झाली
तरी दिमाखात उभे रहात आपल्या मनात पूर्वसुरींविषयी आदर
व दबदबा निर्माण करीत दिमाखाने उभे आहेत.आपल्या भारत
भूमीतील गतकाळातील स्थापत्य शास्राचा विचार कराता आज
ते नव्या स्थापत्यविशारदांना जणू आव्हान देत उभे आहेत! बघा
शेकडो वर्षे झाली तरी आम्ही दिमाखात उभे आहोत, जमेल
तुम्हाला आम्ही आहोत तशी निर्मिती ? ताज महाल फत्तेपूर शिक्री राजस्थानातील अप्रतिम राजवाडे व किल्ले, खजुराहोची अपूर्व व अजोड अशी मंदिरे पाहता आमचे पूर्वज
खरोखर किती प्रगत होते हे कळते व नकळत या देशाविषयी
व पूर्वजांविषयीचा आदर दुणावतो हे नक्की ! एकच सांगते
काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत हा देश विविधतेने नटला
आहेच पण त्याची एकताही अभंग आहे.

मौर्य चाणक्य काळा पासून किती आक्रमणे आली आणि
गेली पण हा देश कधी ही दुभंगला नाहीच पण येणारे प्रत्येक
आक्रमण त्याने प्राण पणाला लावून परतवून लावलेच व
आपली अस्मिता अखंडपणे जपली याची कैक उदा. इतिहासाच्या पानावर जागोजाग विखुरलेली तुम्हाला आज ही
दिसतील . अशा या देशावर प्रेम नाही बसले ही गोष्टच शक्य
नाही. भारतातल्या प्रत्येक प्रांताची घडण व इतिहास वेगवेगळा
आहे. महाराष्ट्राचा इतिहास ही असाच डोळे दिपवणारा आहे हे
आपण जाणताच.दक्षिणेतली मंदिरे नि गोपुरे हा तर स्वतंत्रपणे
लिहिण्याचा विषय आहे इतका त्याचा इतिहास मोठा आहे.
“विविध सुवासिक फुलांची सुंदर सुवासिक माला”असाच
आपला देश आहे. एक हाक मारताच क्षणात एवढा प्रचंड
देश एक होतो याचा ही अनुभव आपण वारंवार घेतला आहे.
आणखी काय हवे हो ?

खूप खूप लिहावसे वाटते आहे मला .. पण थांबते..
“ जय जय राष्ट्र महान, प्यारा हिंदुस्तान”
“जयहिंद”

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ ॲागष्ट २०२२
वेळ : सकाळी ८ : ०२

प्रतिक्रिया व्यक्त करा