You are currently viewing विद्यार्थी घडविण्यात श्री. पाटील यांचे योगदान मोठे – विजय पाटकर 

विद्यार्थी घडविण्यात श्री. पाटील यांचे योगदान मोठे – विजय पाटकर 

मालवण (मसुरे) :

 

विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले जयसिंग पाटील हे स्वतः उत्तम खेळाडू असल्याने मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये त्यांनी एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून तसेच वडाचापाट येथिल शांतादुर्गा हायस्कुलचे मुख्याध्यापक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. क्रीडा क्षेत्रातील भंडारी हायस्कुलच्या यशात पाटील यांची मेहनत मोठी आहेच शिवाय वडाचापाट सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याने त्यांचे हे कार्य संस्था नेहमीच स्मरणात ठेवेल असे गौरवोद्गार भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर यांनी येथे बोलताना केले.

वडाचा पाट येथील श्री देवी शांतादुर्गा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जयसिंग नामदेव पाटील हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्यात श्री पाटकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, अभिमन्यू कवठणकर, वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, श्री पंडित माने, भंडारी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुप्रिया टिकम, वडाचा पाट हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल, आनंदी पाटील, अनिकेत पाटील, पत्रकार प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्री कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले .

यावेळी बोलताना श्री विजय पाटकर यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना पाटील यांचा स्वभाव दानशूर असल्याने त्यानी संस्थेला आर्थिक केले आहे. संस्थेबरोबरच विद्यार्थ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत करणे हा श्री. पाटील यांचा स्थायीभाव असल्यानेच त्यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला असेही श्री पाटकर म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना श्री. जे. एन. पाटील यांनी लहानपणी खो-खो खेळामुळे आपण खेळाकडे आकर्षित होऊन पुढे चार वर्षे राष्ट्रीय स्तरावर खेळलो. क्रीडाशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम करताना आपण विद्यार्थ्यांशी नेहमीच मित्रत्वाचे नाते ठेवले. याचा फायदा मला होऊन मी अधिक सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकलो. या सर्व वाटचालीत संस्थेचे, शिक्षकांचे त्याचप्रमाणे कुटुंब व मित्रांचे सहकार्य लाभल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, शाळेला विसरू नये, शाळेच्या प्रगतीसाठी मदत करत राहावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री पाटील यांचा श्री. पाटकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ,भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर सौ. आनंदी पाटील यांचाही सौ. सनये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची तसेच शाळेच्या आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भाषणे झाली. शेवटी प्रतिभा केळुसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका दळवी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा