सावंतवाडी
मुंबई ऐक्यवर्धक संघाच्या मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक शरद गोपाळ भिसे तथा भिसे सर (७९, रा. उभा बाजार सावंतवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेला महिनाभर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर अलीकडे सावंतवाडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यातच उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली तर एक विवाहित मुलगा आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार रमेश भिसे यांचे ते मोठे बंधू तर अनिल व अरुण तसेच संतोष भिसे यांचे ते चुलत बंधू होत. भिसे सर हे देखील छायाचित्रकार होते. सालईवाडा तहसील कार्यालयासमोरील झेरॉक्स सेंटरचे प्रोप्रायटर घनःश्याम भिसे यांचे ते वडील होत.
भिसे सर हे उत्तम क्रिकेट खेळायचे. सावंतवाडीतील सुप्रसिद्ध बॅड बॉईज संघाचे ते काही काळ सदस्य राहिले होते. मळगाव येथील क्रिकेट संघातूनही खेळायचे. त्यांचे सहकारी सय्यद सर यांच्यासह ते नेहमी सहभागी होत असत. सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध कळसुलकर हायस्कूल येथे काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली होती त्यानंतर ते मळगाव स्कूलमध्ये रुजू झाले होते. मराठी व विज्ञान विषय ते शिकवायचे. अत्यंत मनमिळावू असतमुख व खेळकर वृत्तीचे असलेल्या भिसे सर यांच्या निधनामुळे विद्यार्थी व शिक्षकवृंदामधून हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.