विधवा प्रथा बंद… चाल तू पुढे! मिशन वात्सल्य उपक्रम
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने विधवा प्रथा बंद… चाल तू पुढे! मिशन वात्सल्य श्रावणमेळा या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,व राजापूरचे आमदार राजन साळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून या श्रावणमेळा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. चांगल्या नियोजनामुळे या कार्यक्रमाला सुहासिनी महिला, विधवा, कुमारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आ. वैभव नाईक, आ. राजन साळवी यांचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, समाजात महिलेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज समाजात ज्या काही प्रथा – रुढी परंपरा आहेत, याबाबत जनजागृतीसाठी कुडाळ पं. स.ने आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. गतवर्षी याच पंचायत समितीने श्रावणमेळा कार्यक्रमांतर्गत दशावतार, भजन, कीर्तन, ठाकर आदिवासी, धनगर आदी लोककलांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. येथील कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. एकप्रकारे समाज प्रबोधनपर विविध उपक्रम कुडाळ पंचायत समिती राबवित असल्याचे आ. नाईक सांगितले.
विधवा प्रथा बंदबाबत हा कार्यक्रम असल्याने काही विधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. तसेच पं . स. अंतर्गत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात नाटिका गीत, फुगडी, दशावतार, आदी कला सादर करून विधवा महिलांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. दरम्यान जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन विचार व्यक्त केले.
याप्रसंगी जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,तहसीलदार आमोल पाठक,गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, पंचायत समिती कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, माजी सभापती नूतन आईर, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, गीता पाटकर,जी. प. सीईओंच्या स्वीय सहाय्यक रिया आळवेकर, माजी नगरसेविका उषा आठल्ये, महिला प्रतिनिधी म्हणून सायली सागर कांबळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.