सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे देशात कोरोनाचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला आहे. असे असले तरी राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थिती सुधारत गेल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
आरोग्यमंत्री शनिवारी नगर दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी तसे संकेत दिले. राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिला. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातच कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार आहे, असेही टोपे म्हणाले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत.
तसेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू, असे त्यांनी सांगितले.