सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख
मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
कोशारी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो- महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. गुजरात, राजस्थानच नव्हे तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात मराठी मनगटाचा आणि मुत्सद्देगिरीचा दबदबा होता. हे तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा, तुम्हाला मराठी मातीचा इतिहास कळावा यासाठी आम्ही इतिहासाची पुस्तकं तुम्हाला मोफत उपलब्ध करून द्यायला तयार आहोत. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी इथल्या मराठी माणसांनी आपलं रक्त सांडलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा,म्हणजे आचार्य अत्रेंचे ‘नवयुग’मधील अग्रलेखही तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देता येतील. तुमच्या मनात मराठी माणसाबद्दल इतकी तुच्छता असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद सांभाळणे ही मराठी जनासाठी अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे.
तुम्ही जर असं समजत असाल की सत्तेचे वारे तुमच्या मर्जीने वाहते आहे म्हणून मराठी मातीचा वाटेल तसे अपमान आम्ही मुकाट्याने सहन करू तर तसे होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर खुद्द औरंगजेब मराठी राज्य बुडवायला इथे तळ ठोकून बसला होता. तो याच मातीत गाडला गेला पण मराठी मातीचं अस्तित्व संपवणे त्याला शक्य झालं नाही. आपण महाराष्ट्रचा मुंबईचाच अपमान केला आहे असे नाही तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा अपमान केला आहे कारण मुंबईच्या जडणघडणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा सहभाग फार मोठा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती मुंबईत आहे. आपण ज्या राज्यांची नावे घेत आहात त्या राज्यातील लोकाना आपल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात मुंबईमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली म्हणून हे लोक इथे आले *अतिथी देवो भव* ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रीयन लोकानी यांना सांभाळून घेतले,सामावून घेतले. यापुढे महाराष्ट्राचा अपमान करणारे वक्तव्य आपण केल्यास मराठी माणूस हा अपमान सहन करणार नाही.