You are currently viewing श्रावणसरी

श्रावणसरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अप्रतिम काव्यरचना*

*श्रावणसरी*

काळ्या कभिन्न मेघातुनी उपजे विद्युलता हासरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी।।ध्रु।।

व्रुक्ष लतेवरी पानोपानी जलबिंदुंची नक्षी
चिंब भिजूनी गीत खुशीचे गातसे पक्षी
फुलवित पिसारा मोर नाचतो टपटप तालावरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी ।।१।।

शालू हिरवा परिधान करूनी सजली अवघी धरती
धुपछाँव हा पदर विराजे डोंगरमाथ्यावरती
शुभ्रधवल जलधारा शोभे मौक्तिक माळेपरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी ।।२।।

इंद्रधनूच्या सभामंडपी जमले देवादिक
पर्वत शिखरावरी होतसे इंद्राचा अभिषेक
रविकिरणांचे मंगल तोरण जलमय कुंभावरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी।।३।।

ढगावरी हा स्वार होऊनी वरुणराज अवतरतो
जलसंपत्ती दान स्रुष्टीच्या पदरी ठेऊनी जातो
ऊनपाऊस श्रावणसुख हे जपते धरा अंतरी
आषाढाला निरोप देऊनी बरसती श्रावणसरी।।४।।

चंद्रशेखर द. धर्माधिकारी
पुणे©️

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =