You are currently viewing शब्दाटकी

शब्दाटकी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांनी गझलकार श्री.जयराम धोंगडे लिखित शब्दाटकी गझल संग्रहाचे केलेले रसग्रहण

शब्दाटकी

हा मराठी गझल संग्रह गझलकार श्री.जयराम धोंगडे, नांदेड (संपर्क: 9834985041, jnd.nnd@gmail.com) यांच्या अप्रतिम गझल रचनांचा खजिना आहे. स्वयं प्रकाशन, पुणे यांनी अतिशय उत्तम मुद्रणाचा नमुना पेश करत प्रकाशित केला असून शुभानन चिंचकर यांची अक्षर जुळवणी, मांडणी व मुखपृष्ठ फारच सुंदर आहे. गझलकार जयराम धोंगडे यांनी आपला हा पहिला गझल संग्रह आपले ति. आई-बाबा यांना अर्पण केला असून आई वडील हे नातेच शब्दांच्या पलीकडले असते याची प्रचिती दिली. शब्दाटकीची पहिली आवृत्ती ३१ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे.
गझलकार श्री. जयराम धोंगडे यांच्या शब्दाटकी या गझलसंग्रहाला ज्येष्ठ गझलकार श्री.बापू दासरी “उमाग्रज” यांची प्रस्तावना लाभलेली आहे. अनाहत नाद लय आणि या सर्व नादोळीत वेदन लकेरीतील शब्द मिसळत जाताच आपोआप कविता स्फुरत जाते. वेदनेची पणती ठेवताना आठवणींच्या मंद सुवासाचा दरवळ अभिव्यक्तीच्या अवकाशात मुक्त पखरत करत जातो. कविता रोमा रोमात भिनत जाताना नाद लय आणि त्यातील मनोवेधकता जेव्हा गझल विद्येला समर्पित होत जाते तेव्हा कवी गझलकार बनू लागतो.
ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी लिहिले की, कविता म्हणजे दुधाप्रमाणे गझला म्हणजे नुसती मलई… कारण शब्दांच्या अविरत मंथनात कवितेतील काव्याची मलई सफाईदारपणे उचलली जाते ती गजलेतच…!
गझलकार जयराम धोंगडे यांच्या शब्दाटकी मध्ये तब्बल पंच्याहत्तर एकापेक्षा एक सरस गझलांचा वर्षाव झालेला आहे.
आपल्या आईच्या स्मृती जागृत करताना गझलकार जयराम धोंगडे यांनी ‘झालो खरा भिकारी’ या शीर्षकाखाली आईची महती विशद करणारी अप्रतिम गझल लिहिलेली आहे…
*फेडू तुझे कसे गे हे पांग सांग ना तू?*
*रोखू कसे उसाचे? माझा इलाज नाही!*
आपल्या आईने आपल्यावर केलेले उपकार कसे फेडायचे? हे आपल्या आईलाच गझलकार जयराम धोंगडे विचारत असून तिच्या आठवणीने खोलवर हृदयातून येणारे उसाचे कसे रोखायचे? ते रोखण्यासाठी आपल्याकडे इलाजच नसल्याची ते प्रांजळ कबुली देतात.

*सांगा अरे सुखांनो गेलात दूर कोठे?*
*गाऊन दुःख अवघे, कंठात सूर कोठे?*
माणसाच्या आयुष्यात आलेल्या दुःखांचा सामना करताना हातानं काम नाही आणि पोटात भूक मोठी… शेतकऱ्याची शेती सुद्धा वाहून जाते मग अशावेळी त्या मजुराने जावे कुठे? आहे गंभीर प्रश्न उभा राहतो… असे प्रश्न उपस्थित करून कवीने दुःख वाट्याला आल्यावर सुखांनाच विचारणा केली की, तुम्ही गेला तरी कुठे?
पैसा देखील पैसेवाल्यांकडे जातो आणि निर्धन मात्र खाली हातच राहतो… असे अनेक प्रश्न कवीने कंठात सुरू कोठे? आपल्या गझलेतून विचारले आहेत.

*सरतील दुःख सारे उगवेल दिन सुखाचा*
*झोकून दे भलेही, भगवंत तो स्मरावा!*
कवीने आपल्या ‘मनमोगरा फुलावा’ या गझलेतून सर्व दुःख सरतील आणि पुन्हा एकदा नव्याने सुखाचे दिन येतील… त्याकरिता भगवंताचे नेहमी स्मरण करून आपल्या कार्यात झोकून देण्याची प्रेरणा जागृत केली आहे.

*सारे कसे मिळणार ते एकाच वेळी सांग तू?*
*देणार तो घेणार तू थोडा गड्या मग थांब तू!*
‘फेड पांग तू!’ या गझलेतून कवीने एकाच वेळी सर्व काही मिळणार नाही. जो देणार तो सुद्धा काहीतरी घेणार, म्हणून तू थोडा थांब… असा सल्ला दिलेला आहे. त्याचप्रमाणे या गझलेतून दुसऱ्या कोणास असलेली पीडा तुला समजत नाही… तू तुझ्या मस्तीतच असतो आणि दुःखात देखील तू कोसभर लांबच असतोस… असे सांगत तू तुझ्या आशांची यादी वाढवू नकोस. जन्मास तुला घातले, पान्हा पाजून पोसले, त्या दुधाचे तू पांगफेड अशाप्रकारे कवीने एकापेक्षा एक सुंदर शेर सादर करून गझलेला वेगळ्या उंचीवर नेले आहे…

*लावून जीव ज्यांनी जपले फुलाप्रमाणे*
*त्या वृद्ध मायबापा जप लेकरा प्रमाणे*
मायबापा प्रति असलेले प्रेम आणि मुलांनी मायबापांना त्यांच्या वृद्धापकाळात कसे जपावे याचे विवेचन केले आहे. जसे त्यांनी आपल्याला जीव लावून फुलाप्रमाणे जपले तसेच आता त्यांना लेकराप्रमाणे जपावे, आपल्या आई बापाने गुराप्रमाणे काम करून आपल्याला मोठं केलेलं असतं…त्यांसाठी त्यांच्या वृद्धापकाळात आपण थोडा वेळ काढून त्यांच्याशी गोड बोलावे… प्रत्येकावर वृद्धापकाळ सारखी वेळ येणारच आहे, आणि प्रत्येक जण आपले आयुष्य जगून जाणारच आहे.. त्यामुळे भावी पिढीला सुद्धा प्रेमाची महती कळावी यासाठी ‘मायबाप’ या आपल्या गझलेतून कवीने मायबापा प्रतीचे प्रेम उस्फूर्तपणे मांडले आहे.
‘प्रभाव’ या गझलेतून पैशांचा माणसावर असलेला प्रभाव… ‘चूक त्यांची खोडली’ या गझलेतून माणसाने माणसाला जोडणे… जरी ते गैर वागले तरी त्यांना माफ करणे आणि स्वतःच बोलून माणसांमधील कोंडी फोडणे. अशा विविध मानवी सवयींवर भाष्य केलेले आहे.

*भले करावे भलेच होते*
*मलाच माझे कळून गेले*
त्याचप्रमाणे
*जिंकून घे जगाला बोलून गोड थोडे*
*ताठा उगा कशाला नात्यास जोड थोडे*
असे म्हणत गझलकार श्री.जयराम धोंगडे यांनी आपल्यामध्येच बदल घडवून जगाला जिंकून घेण्याचे तंत्र शिकविले आहे.
नशिबाला दोष देण्याची जशी आजकाल प्रथाच झाली आहे… परंतु घाम गाळून आपले भाग्य, नशीब उज्वल बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा कवीने आपल्या ‘जिंकून घे जगाला’ या गझलेतून दिलेली आहे.
बाजार, तमाशा, भाऊ, मित्र, आत्मनिर्भर, रितेच येणे रितेश जाणे, अशा समाजातील प्रत्येक संवेदनांवर भाष्य करणाऱ्या गझल शब्दाटकीमधून कवींनी आपल्या समोर ठेवल्या आहेत.

*नको क्रोध आता उगा देह जाळू हसावे रुसावे जरासे जरासे*
*नको हट्ट तो ही जरा धीर ठेवा उठावे बसावे जरासे जरासे*
आता क्रोध करू नका, आणि उगाच आपला देह जाळू नका, थोडेसे हसावे, थोडेसे रुसावे, धरू नये हट्ट, जरा धीर ठेवून थोडे उठावे, थोडे बसावे, अशाप्रकारे कवींनी क्रोध जाळून टाकून देहरूपी आत्म्याला हसत ठेवण्याचे जणू काय आवाहनच केले आहे. माणसाने माणसाशी बोलताना असे गोड बोला की मनाला हर्ष व्हावा आणि माणसाने माणसाला जरासे का होईना पण उराशी धरावे. अशी भावना कवीने आपल्या ‘जरासे जरासे’ या अप्रतिम गझलेतून व्यक्त केली आहे.
गझल रसिकांच्या आनंदाला पाझर फोडतील अशा अनेक रचना कवींनी आपल्या शब्दाटकी या गझलसंग्रहातून आपल्यासमोर भगवंताचा प्रसाद द्यावा तशाच दिलेल्या आहेत. पारिजातकाचा सडा अंगणात सांडावा आणि मुक्तहस्ताने आपण तो ओंजळीत भरून घ्यावा…. तशाच गझलकार जयराम धोंगडे यांच्या शब्दाटकीतील रचना आपल्या मनातील ओंजळीत भरून घेण्यासारख्या आहेत.

*शब्दाटकी*….

*जोडताना तू नव्याला का जुने ते सोडतो*
*चांगले जे बोलती का शब्द त्यांचे खोडतो?*

*घेतलेले काम हाती चोख व्हावे ध्यान दे तू*
*होत नसता एकही धड का मनाने मोडतो?*

*वाग थोडा नेटका अन् देत जा तू प्रेम सारे*
*ना बरा तुसडेपणा जो माणसांना तोडतो*

*पूर वादाचेच आता वाहती ते सारखे*
*हो असा तू पूल जो की काळजाला जोडतो*

*मांडलेली आवडो माझी खरी शब्दाटकी,*
*भावनेच्या आत माझ्या मी जगाला ओढतो*

गझल म्हणजे *गागर मे सागर!* माधवराव पटवर्धनांनी लावलेल्या मराठी गझलच्या रोपट्याचा सुरेश भटांनी वटवृक्ष केला आणि आता या वटवृक्षाला अगणित पारंब्या फुटल्या आहेत…फुटत आहेत. त्यातीलच नव्याने फुटलेली एक पारंबी म्हणजे *जयराम धोंगडे*..!
अशा प्रसंशनिय शब्दात *गझलगंधर्व सुधाकर कदम* यांनी गझलकार जयराम धोंगडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
“शब्दाटकी” हा गझलकार श्री.जयराम धोंगडे यांचा गझलसंग्रह सर्वांनी वाचवा असाच आहे…आपण सर्वांनी जरूर वाचा आणि गझलांचा सुवास मनामनात भरून घ्या…

शब्दांकन
【दीपि】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा