श्रीधर पाटील आणि सहकाऱ्यांविरोधात गौण खनिज वाहनचालकांचा हप्तेबाजीचा आरोप – भाजपा नगरसेवक अभी गावडे यांनी दाखल केली तक्रार
खडी, वाळू आदी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून चाललेल्या आर्थिक लुटीबद्दल भाजपा नगरसेवक अभी गावडे यांनी प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यासह त्याचा वाहनचालक संदीप परब व यात गुंतलेल्या संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हंटले आहे की सावंतवाडी तालुक्याचे प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री. श्रीधर पाटील या अधिकाऱ्याकडून, तसेच त्याचे शासकीय वाहन चालक संदीप परब यांच्याकडून आर्थिक लुटीचे गैरव्यवहार प्रचंड वाढले आहेत. सदर तहसीलदार आणि त्याचे वाहन चालक हे रस्त्यावरून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून त्यांचेकडून बेकायदेशीर आर्थिक लूट करत आहेत. काही ठराविक गाड्यांवर नाममात्र कारवाई केली जात असून अन्य वाहन चालकांना मोठ्या दंडाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची लूट रोजच चाललेली आहे. या त्यांच्या “शासकीय” वाटमारीत त्यांचा ड्रायव्हर संदीप परब हा देखील या जबरदस्तीच्या आर्थिक लुटमारीत सहभागी असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सदरचे प्रकार रात्रंदिवस सुरू असून शासनाच्या या बेकायदेशीर कृत्याने वाहन चालक व व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. या बेकायदेशीर लुटमारीच्या धंद्याने व्यावसायिकांमध्ये संतप्त भावना आहेत याचीही गंभीर नोंद प्रशासनाने तातडीने घ्यायची गरज आहे. सदर प्रभारी तहसीलदार श्री पाटील यांना प्रशासकीय वरदहस्त आहे का, किंवा त्यांची नियुक्ती ही सुडापोटी अशा प्रकारच्या लुटमारीसाठीच केली आहे की काय असा संभ्रम निर्माण होत आहे. याचे कारण म्हणजे या अधिकाऱ्याचे एकंदरीतच असलेले बेमुर्वत वर्तन हे आहे. या अधिकाऱ्याने नियुक्तीच्या पहिल्याच दिवसापासून शासकीय वाहन असलेल्या MH-07-G-2231 या गाडीच्या सर्व काचा बेकायदेशीररित्या गडद काळ्या फिल्मने झाकलेल्या आहेत. यामागचा हेतू सरळसरळ अतिशय संशयास्पद आणि चुकीचा आहे हे स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर गाड्या थांबवून मांडवली करण्यासाठी MH-09-FJ-2028 या खाजगी गाडीचा वापरदेखील तहसीलदार यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या गाडीत तहसीलदार नसतानाही अन्य अज्ञात माणसेही तहसीलदार यांचे नाव सांगुन वाहनचालकांना रात्री-अपरात्री अगदी सुटीच्या दिवशीही अडकवतात व आर्थिक लूट करतात अशा प्रकारच्या तक्रारी आहेत.
नगरसेवक अभि गावडे यांच्या या थेट तक्रारीने शासकीय वर्तुळात खळबळ माजली असून प्रकरण दडपण्यासाठी हालचाली वाढल्याचे समजते. सदर तक्रार पुढील कारवाईसाठी कोकणआयुक्त, माजी खासदार निलेश राणे, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.