You are currently viewing “मी जिल्हापरिषद व राजकारण बाळा गावडे यांच्यामुळेच करतो…”

“मी जिल्हापरिषद व राजकारण बाळा गावडे यांच्यामुळेच करतो…”

बाळा गावडे समर्थक संदीप कोठावळे यांनी गुरुनाथ पेडणेकर यांना करून दिली आठवण

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी काँग्रेस पक्ष त्याग करून पूर्वाश्रमीच्या घरी म्हणजे शिवसेना पक्षात परतले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून स्वगृही दाखल झाले. शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि शिवसेना कोणाची? असा प्रश्न उभा राहिला असतानाच पक्षातून बाहेर गेलेले जुने शिलेदार पुन्हा पक्षात परतु लागले आहेत. काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले बाळा गावडे यांच्यावर इन्सुलिचे माजी जि. प. सदस्य गुरुनाथ पेडणेकर यांनी टीका केली होती. पेडणेकर यांच्या टिकेला उत्तर देताना “जे ग्रामपंचायतीला तीन वेळा पडले त्यांना बाळा गावडे यांनी जिल्हापरिषद दाखवली”… “मी जिल्हापरिषद व राजकारण बाळा गावडे यांच्यामुळेच करतो”…. असे जाहीरपणे स्वतः गुरुनाथ पेडणेकर कबूल करत होते…हे इन्सुलीवासीयांना ज्ञात आहे, असे बाळा गावडे समर्थक संदीप कोठावळे यांनी सांगत गुरुनाथ पेडणेकर यांना त्यांच्या इन्सुली गावातील झालेल्या पराभवांची आठवण करून देत जुन्या जखमांवरील खपली काढली आहे.
संदीप कोठावळे यांनी पुढे बोलताना असेही सांगितले की, बाळा गावडे काय राजकारण करू शकतात हे सर्वांनाच ज्ञात आहे. गुरुनाथ पेडणेकर यांनी बाळा गावडे यांच्यावर बोलू नये. स्वतः बाळा गावडे इन्सुली मधील कोणाही कार्यकर्त्यांवर कधीतरी बोलले नाहीत, हे सुद्धा पेडणेकर यांनी समजून घ्यावे”.
बाळा गावडे हे जिल्हापरिषदेतील माजी आरोग्य व बांधकाम सभापती, सावंतवाडी पंचायत समिती सभापती, सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष आदी पदांवर काम केलेले धडाडीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवांमुळे त्यांनी मोठमोठी पदे भूषविली आहेत, त्यामुळे गुरू पेडणेकर यांना त्यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असेही संदीप कोठावळे यांना सूचित करावयाचे आहे. भविष्यात शिवसेनेला चांगले दिवस आले तर इन्सुली विभागात गुरुनाथ पेडणेकर यांना बाळा गावडेंकडून राजकीय धोका असल्याने आपले राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी गुरुनाथ पेडणेकर यांनी बाळा गावडेंवर टीका केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा