You are currently viewing आभाळ दाटलेले, पण बरसत नाही कुठे!

आभाळ दाटलेले, पण बरसत नाही कुठे!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखीत अप्रतिम लेख*

*आभाळ दाटलेले, पण बरसत नाही कुठे!*

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९)

कधी कधी आभाळ भरून यावं तसं मनही भरून येतं. मनाच्या सांदीकोपऱ्यात साठून राहिलेले सुखदुःखाचे क्षण मनाच्या आभाळात दाटून येतात. गोव्यात पावसाळ्यात असं आभाळं दाटून येतं आणि कधी कधी अचानक बरसायला लागतं. म्हणजे तसं दाट आभाळ दाटून आलं की समजायचंच पाच दहा मिनिटांत वारा आणि पाऊस धरणीला भेटायला येणारंच. महाराष्ट्रात तसं होत नाही. आभाळ दाटून आलं तरी पाऊस येईलच, याची शाश्वती नसते. त्याला मुळी धरणीला भेटायचंच नसतं तिथं. त्याचं आपलं डोंगरावरच प्रेम. तिथं तो मनमुराद बरसत असतो. त्या पर्वतरांगांविषयीच त्याला अतीव प्रेम का? असं विचाराल तर तिथं असलेली झाडं त्याला अडवणारा वारा आणि त्याला साद घालणारी पाखरं तसेच निरागस प्राणीदेखील त्याला अडवू पाहतात की काय असंच वाटतं. ‘पाऊस नदीचा प्यारा आणिक जलाचा प्यासा’ असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पावसाचा जन्मच मुळी पाण्याचे आगर म्हणा माहेरघर म्हणा अशा समुद्रामुळे आणि मोठमोठ्या नदीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन होत असल्याने आणि नद्या तर डोंगरातूनच उगम पावतात म्हणजे ते पावसाचे मूळच असे म्हणायला हरकत नाही. म्हणून कदाचित तो तिथं रेंगाळत असावा. पक्ष्यांचे कूजन ऐकत तो तिथं बसतो किंवा वसतो म्हणावं तर तिथं तर पक्षी फारसे दिसतच नाहीत. किंवा तेच त्याचे लाडके असावेत. माळावरती पाखरांचा किती किलबिलाट असतो. तिथे तो का रमत नाही तर तिथं त्याला भावणारी हिरवळ कमी असते की काय, असा प्रश्न माझ्या मनात सदैव येतो. आपल्याकडे चारच महिने पावसाळा असतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू आपल्याकडे सृष्टीला बहरवतात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आताशा ऋतूंना काय आहे झाले । ते आपले बहरणे विसलेत । दूरवर कुठे आभाळ नाही । निळ्या आकाशात विसावलेत । असा पदोपदी प्रत्यय येतो. माणसाच्या लहरीपणासारखाच आताशा निसर्गही लहरी बनलाय हे मात्र खरे आहे. पूर्वी कसा शहाण्यासारखा वागणारा पाऊस निरागस लहान मुलांनी खोटा पैसा दिला तरी नियमित येणारा पाऊस आताशा का वैतागलाय हे मात्र कळत नाही. परवा परवा पर्यंत माणसे किती चांगली वागायची. लोकांना सद्वर्तनाचे काहीच देणेघेणे नसते. ते आपल्याच गुर्मीत वागतात. त्यांना चांगुलपणाची महती पटलेली नसते, असे नाही परंतु त्यांचे मन त्यासाठी तयार नसते. वरचेवर परिस्थिती बिघडत चालली आहे. पावसाला पूर्वी लहान मुलं खोटा पैसा देत अर्थात पैसे काही मुलं कमावत नसतात. मोठी माणसं देतात तोच पैसा आणि मोठी माणसं ऐकवतात तेच गाणं मुलं पावसाला म्हणतात. यात मुलांचा काही दोष नसतोच मुळी आणि माणसांचा हा खोटेपणा पाहून पाऊस आता शहाणा झालाय असं मी माझ्या कवितेत म्हटलं आहे. पावसाचा निसर्गप्रेमाचा आविष्कार म्हणजे फुलून येणारी धरती. भुईत रुजलेले कोंब अगदी आनंदाने नाचत असतात. त्यांच्या मनातील आनंद फुलांच्या रूपाने दिसतो. त्यांनी हसून साजरा केलेला आनंद पावसालाही पाहायचा असतो. हे सारं डोंगरउतारावर व नजीकच्या आणि नदीच्या किनारी हे विहंगम दृश्य दिसतं. ते पावसाला भावतं आणि त्यांच्यासाठीच पाऊस येत असतो. पावसाला त्यांचं आकर्षण असतं. पावसानं भरभरून आलं की हिरवळ किती प्रसन्न होते. त्यांच्या या नात्याला मान देत गवतफुलं, झाडं पेडं आणि नदीकाठडे माड, आम्रवृक्ष इतकंच काय झऱ्यांचा खळखळाट देखील पावसाच्या स्वागताला सज्ज होतात आणि पर्जन्यराजाही त्यांना साथ देण्यासाठी उत्सुक असतो. त्याच्या आगमनाने धरतीचा रोम रोम रोमांचित होतो. मातीच्या कणाकणांतून सुगंधाची उधळण होत असते. त्याला मृद्गंध असे संबोधतात. मातीच्या या नैसर्गिक सुगंधापुढे कन्नोजचे सुगंधी अत्तर देखील खूप फिक्के पडते.आता शहरात सर्वत्र सिमेंटची जंगले आहेत. ती भिजली तरी जमीन नसल्याने या जंगलातून सुगंध कुठून येणार? मातीचा सुगंध फुलायचा असेल तर काळी जमीन काळं सोनं असायला हवं, त्यातच नामांकित बियाणं रुजत. तसंच मृद्गंध येण्यासाठी वैशाखात तप्त झालेली भूमी हवी. तिच्यावर पहिल्या पावसाचं पाणी पडलं की अत्तराहून भारी सुगंध येतो, त्याला काही तोड नसते. तिच्या त्या सुवासाच्या धुंदीत पाखरं उडणं विसरून जातात. गुरं हंबरणं विसरून जातात. ती या मृद्गंधाच्या नादात जगणंच क्षणभर विसरून जातात. तापलेल्या मातीवर मृगाचे थेंब पडतात आणि मन विभोर होऊन जातं. त्या थेंबाची वाफ होते. ती सर्वत्र सुगंध रूपाने दरवळते. सारा परिसर एका धुंदीतच जगतो. त्या धुंदीतच जग बेधुंद होऊन स्वतःतच दंग होते. या धुंदीत जगाचा विसर पडतो. त्या धुंदीचा परिणाम जगावरही होतो. जग जणू दुसऱ्या विश्वातच जगते. फुलपाखरं उन्मादानं उन्मुक्त होऊन विहरत असतात. भवतालचं भान विसरून ती आपल्याच नादात गुणगुणतात. भवताली माणूस नावाचा किंचितसा दुष्ट प्राणी वावरतो आहे, तो काळच होऊन आपल्याला चिमटीत घेईल, याविषयी ते बेफिकिर असते. त्या मृद्गंधाने ते मोहीत झालेले असते. भोवताली सरडा त्याची शिकार करण्यासाठी टपलेला असतो परंतु त्याच्या ते गावीही नसते इतके ते फुलांचा मकरंद आणि पानांवरील दंवबिंदू टिपण्यात मग्न झालेले असते. त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का असं कोणी कवी त्या निसर्गाला म्हणून जातो. फुलांना गंध कुठून येतो तर पहिल्याच आणि नंतरच्या पावसाने भूमीला आलेला म्हणजे मृद्गंध त्याच्या नसानसांत भिनतो आणि संपूर्ण झाडाच गंधान भारून जातं. त्याच्या फांदीवरती बसलेल्या पाखरांना त्या गंधाचं वेड लागतं आणि ते शिकाऱ्याच्या बाणात येतं. हे विहंगम दृष्य अर्थात १९७२च्या दुष्काळापूर्वीचं आहे. आता पावसाला माणसांच्या हावरटपणाची दृष्ट लागली आहे. त्यानं झाडांची बेमूर्वतपणे कत्तल केली आणि पावसांला आकर्षून घेणारा घटकच त्यानं गिळून टाकला. आता कोरडे आभाळ फिरते या गगनी खाली त्रासते किती ही आर्त तृषार्त धरणी. पूर्वीसारखे आभाळ दाटून येते या धरणीच्या मायेपोटी, किती तरसलेले असते त्या धरणीच्या स्पर्शासाठी परंतु त्या जलद गतीने जाणाऱ्या जलदाला अडवायला पर्वत रांगांवर आणि भूमीवरदेखील झाडंच राहिली नाहीत. त्यामुळे आभाळ दाटून येते तरीही ते कुठेही बरसत नाही. परंतु त्या आभाळाचा रोष एखादवेळी झाला तर तो अतिशय भयंकर असतो. त्याच्या क्रोध इतका विचित्र असतो की ढगाची पखाल फुटून त्यातील सर्वच पाणी एकाच ठिकाणी कोसळून त्याचे गंभीर परिणाम होत असतात. मग दरडी कोसळून अपघात व दुर्घटना घडत असतात. त्याची जाणीव माणसांना होत नाही. परंतु एखादवेळी आपलीच माणसे या अशी दुर्घटनेत वाहून गेली की तात्पुरते वाईट वाटतो माणसांना. परंतु काही काळ जातात परत पहिले पाढे पंचावन्न म्हणत माणसे कुत्र्याच्या शेपटासारखी वाकडी ती वाकडीच. मगा आभाळ दाटले की वाटणार आनंद, त्याला वाटत नाही. खुरटलेली झाडे मात्र आशाळभूत नजरेनं त्या आभाळाकडं बरसण्यासाठी तरसून प्रार्थना करतात तरीही त्याला कवेत घेण्याची ताकद हरवलेली झाडे निराश होऊन अगतिक बनतात आणि आपलं अस्तित्व हरवण्याच्या भीतीपोटी जागेवरच थरकापतात. संवेदनशील मन असलेल्या निसर्गपुत्रांनाच ते कळते आणि हो धरणीमायला देखील कळते. ती आसूसलेल्या नजरेने त्या आभाळाला बरसण्याची विनवणी करते. दुसरीकडे बेभान झालेला पावसाला थांबण्याची विनंती करणारी पाखरे केविलवाणी धाकात इतस्तः भेदरून पळतात आणि ओरडतातदेखील. वाऱ्याचं आणि पावसाचं एक अदृष्य नातं असतं. पावसाळ्यात वारा सुटला की पावसाचे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अलगद जलद गतीने वाहून नेतात म्हणून त्याला जलद म्हणत असावेत. अर्थात ते पावसाचे ढग असतात, जल वाहून आणतात म्हणून ते जलद असतात. सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या प्रदेशात त्याच्या आगमनाची चाहूल लागली तरी आनंदाच्या किती उकळ्या फुटतात. तो बरसू लागला की, धरणीची लाही लाही कमी होऊन धरणीची तृषा भागते ती शांत शांत होते. तरीही या मीलनाने धरणीची धग आणखी वाढते कदाचित त्यातूनच जमिनीत रुजून आणि रुतून बसलेल्या बिजातून तृणपाती धरणीचे पोट फाडून बाहेर येतात आणि लवलव करी पातं असा अनुभव येतो. परंतु अनेकदा आभाळ दाटलेले पण बरसत नाही कुठे असा आक्रोश सुरू असतो अनेक ठिकाणी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 7 =