You are currently viewing वारस (भाग १५)

वारस (भाग १५)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री आसावरी इंगळे (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*

*वारस (भाग १५)*

गाडी थांबताच जुईला कडेवर घेऊन राघो उतरला.. दोघी अविश्वासाने पाहत राहिल्या..

“जुई…माझं बाळ.. कुठे गेली होती गं तू आईला सोडून..”, कामिनी जुईकडे झेपावणार इतक्यात राघोने कामिनीला अडवले.

“हं..हं… पहिले ओवाळा लेकीला..मगच ती आईजवळ येणार..”

“क..काय..?” कामिनीचा विश्वास बसत नव्हता! राघो चक्क तिच्याशी बोलला होता!!

“हं.. कन्या आली आहे घरी… साक्षात देवीचे रूप आले आहे.. तिची आरती तर उतरवयालाच हवी नं..”

कामिनीने घाईघाईत जुईची आरती ओवाळली. राघो तिला घेऊन घरात आला. जुईने कामिनीकडे झेप घेतली. कामिनीने तिचे पटापट मुके घेतले आणि तिला शालूजवळ घेऊन गेली. शालूनेही तिचे खूप लाड केले. तितक्यात कामिनीने तिच्या खोलीत जाऊन एक पेटी आणली.

“काय आहे हे?”

“मी जुईला घेऊन हे घर सोडते आहे.”

“काय?”, दोघेही आश्चर्यचकित झाले.

“पण का..? आता तर सगळं ठीक झालंय कामिनी..जुईदेखील मिळाली.”, शालूने आश्चर्याने विचारले.

“शालू.. गुरुजींनी सांगितलं म्हणून जुई घरात आली! ..ईश्वर न करो, उद्या अजून काही विपरीत घडलं तरी तिचाच पायगुण असेल..मी भलेही कडकी असेल पण माझ्यासाठी माझी मुलगी लाख मोलाची आहे. एकदा गमावलं तिला..पुन्हा तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही.”, तिने एका हातात जुईला घेतले आणि दुसऱ्या हातात पेटी उचलली.

“कामिनी, मला माझी चूक कळली.. खरंतर पायगुण मीदेखील मानत नाही.. जे घडलं ते बोलाफुलाची गाठ असू शकते, हे कळतंय मला पण पुत्रमोहापायी मी अंध झालो होतो.. जुईबद्दल मला प्रेम वाटू लागलं होतं पण ते कबूल करायला मन तयार होत नव्हतं.. मी तुझा..तुमच्या दोघींचा ..नव्हे..तिघींचाही गुन्हेगार आहे.. शालू…कामिनी… मी खूप त्रास दिला तुम्हाला…खूप खूप अत्याचार केले.. या… या निरागस जीवाच्या मनाचा जराही विचार केला नाही… प्लीज…मला माफ करा.. प्लीज…मलाही जुईशिवाय जगणे अशक्य वाटते आता. खूप सवय झाली गं तिची इतक्या दिवसात. गुरुजींचा सल्ला एक निमित्त होतं पण जुईला शोधण्यात मी कुठलीही कसर सोडली नव्हती. माझी सर्व यंत्रणा कामाला लावली होती.”, तो कळवळून बोलला.

दोन क्षण शांततेत गेले. कोणीच काही बोललं नाही. कामिनीने तरीही निग्रहाने पेटी उचलली.

“कामिनी प्लीज..प्लीज..मी खरं बोलतोय गं. विश्वास ठेव माझ्यावर.. “, तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

“अनेकदा विश्वास करून फसलेय राघो..आता नाही..”, ती त्याला ओलांडून जायला लागली.

“अजून एकदा विश्वास ठेव..प्लीज..वाटल्यास तर मी होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो..”

“बस..राघो.. नको त्या कोवळ्या जीवाला मध्ये आणू.. नाही जात मी…”, तिने पेटी खाली ठेवली.

“खरंच..! जुई… माझं पिल्लू!…”, राघोने अत्यानंदाने जुईला मीठी मारली.

शालूने कामिनीकडे पाहून नेत्रपल्लवी केली! डॉक्टर, गुरुजी आणि माळी काकांना हाताशी धरून केलेली त्यांची योजना यशस्वी झाली होती! जुई राघोला पाहून पळणार होतीच .. पाणीही जवळ होतं … धोका होताच पण शेवटचा डाव खेळणं भाग होतं!…राघवच्या डोक्यातून ‘वारस’चे भूत तर निघालेच होते शिवाय त्याने जुईला मनापासून स्वीकारले होते!

*(समाप्त)*

प्रतिक्रिया व्यक्त करा