You are currently viewing ११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी भव्य जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा..

११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी भव्य जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा..

सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नथ अशा बक्षीसांची लयलूट; यतिन खोत – शिल्पा खोत मित्रमंडळातर्फे आयोजन

 

मालवण :

 

११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी जिल्हास्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या महिलेला सोन्याचा नारळ आणि पैठणी दिली जाणार आहे. तर द्वितीय क्रमांकास सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकाला चांदीची वस्तू दिली जाणार आहे. या शिवाय उत्तेजनार्थ क्रमांकानाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेला सिने अभिनेत्याची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सौ. शिल्पा खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सौ. शिल्पा खोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सौ. कल्पिता जोशी, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, प्रतिभा चव्हाण, अश्विनी आचरेकर, चारुशीला आढाव, दीपा पवार, चित्रा सांडव, मानसी घाडीगांवकर, स्नेहा कुडाळकर, श्रीकांत मालवणकर, निकिता तोडणकर, सायली कांबळी आदी उपस्थित होते.

यतीन खोत आणि शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने मागील आठ वर्षांपासून महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. महिलांना वाव मिळावा, आणि आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून दरवर्षी महिलांचा वाढत जाणारा सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यंदा नव्या दमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ५ महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असेही सौ. खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्पर्धेसाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह महिला वर्गाचे विशेष सहकार्य लाभत आहे. ही स्पर्धा राजकारण विरहित असून स्पर्धेच्या ठिकाणी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. केवळ महिला वर्गाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी महिलांना नारळ आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आहे. तरी नावनोंदणीसाठी शिल्पा खोत – ९३२६४७७७०७, सायली कांबळी – ९७६४३९७१३९, कल्पिता जोशी – ९४०४९४०९२४ यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील महिला वर्गाने स्पर्धेला मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =