सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात येत्या दोन महिन्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून तीनशेहून अधिक मायक्रोएटीएम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आता ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नाही, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याबरोबर भविष्यात उद्योग उभारण्यासाठी मागेल त्याला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे, असे ही त्यांनी सांगितले.
श्री. दळवी म्हणाले, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहे.
श्री. दळवी पुढे म्हणाले, जिल्ह्यात सिंधुदुर्ग बँकेची ३०० मायक्रो एटीएम सुरू करण्यात येणार आहेत. तर दहा ठिकाणी ह्यूमन एटीएम सुरू होणार आहेत. तसेच उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनामध्ये मिनी एटीएमच्या मशीन पूरविल्या जाणार आहेत… जेणेकरून रात्री अपरात्री कुठल्याही ग्राहकाची पैशाविना गैरसोय होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आमचे बरेचसे ग्राहक वृद्ध किंवा अपंग आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी त्यांना बँकेत येता येत नाही. अशांसाठी येत्या तीन-चार महिन्यात डोअर स्टेप एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेणेकरून आमच्या बँकेचा कर्मचारी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पैशांची भरणा किंवा पैसे काढून देणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल. तर कर्ज घेणाऱ्यांसाठी सुद्धा हीच सुविधा दिली जाणार आहे. अनेक ग्राहक शेतकरी किंवा भाजी विक्रेते आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना बँकेपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे ते खाजगी कर्जाचा पर्याय स्वीकारतात. या त्यांचे व्याजाच्या रूपाने मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा कर्जदारांना सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन कर्ज पुरवठा भविष्यात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.