दहा दिवस झाले तरी संशयित का लपवतात माहिती?
मळगाव येथील विवाहितेचा कोलगाव येथील जंगलात स्वेच्छेने शरीर संबंध ठेवत असताना झालेला मृत्यू हे गूढच होत चालले आहे. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार चार संशयित आरोपीना पोलिसांनी गजाआड केले होते. त्यापैकी दोघे पोलिसांच्या कोठडीत होते तर अल्पवयीन दोघे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. संशयित आरोपींना अटक करून कोर्टात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपी पकडण्यात दाखवलेली तत्परता वाखाण्याजोगीच आहे आणि नक्कीच अभिमानास्पद…!
पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळूनही पंचवीशीतील असलेले तरुण संशयित आरोपी एवढे निर्ढावलेले कसे काय असू शकतात?
संशयित आरोपींनी मृत महिलेची पर्स, मोबाईल, चप्पल, दागिने इत्यादी चीजवस्तू कुठे फेकल्या? त्यांची काय विल्हेवाट लावली याबद्दल ते पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात किंवा दिशाभूल करणारी माहिती देतात त्यामुळे खुनाचा तपास लागून संशयित जेरबंद झाले तरी सबळ पुरावे गोळा करताना पोलिसांना यश मिळत नाही. संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी दरीत केलेले शोधकार्य देखील कुचकामी ठरले, त्यामुळे संशयित आरोपी हे तरुण, नासमज आहेत असा समज करून घेणे नक्कीच चुकीचे ठरणार आहे.
पाचवा संशयित असताना देखील पाच दिवसांच्या कोठडीत त्याचा उलगडा कसा झाला नाही?
या खून प्रकरणात गाडीतील पेट्रोल संपण्याची शक्यता असल्याने संशयित आरोपीना पेट्रोल देण्यासाठी आलेला नारायण गिरी (वय ३०) हा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांच्या गाडीतून आंबोली येथे गेला, विल्हेवाट लावून येताना वाटेत मृत महिलेचा मोबाईल देखील त्यानेच नदी पात्रात फेकल्याचे समोर येत असताना, पाच दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपींनी आणि अल्पवयीन म्हणवणाऱ्या संशयितांनी पाचवा आरोपी असल्याची कबुली का दिली नाही? पाचव्या आरोपीचे नाव का लपवून ठेवले होते? पोलिसांनी या प्रकरणात चारच आरोपी असल्याचेही सांगितले होते, मग पाचवा आरोपी कसा काय या प्रकरणात आला? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग कशावरून नसेल? संशयित आरोपी हे अवैद्य दारू धंद्याशी निगडित असल्याने या प्रकरणाला अशी अनेक वळणे लागू शकतात. त्यामुळे संशयित तरुण आहेत, अथवा अल्पवयीन आहेत, हे विचार न करता ते कुठल्या धंद्यांमुळे असे प्रकार करतात यावरून त्यांच्या गुन्ह्याचा सखोल तपास व्हायला हवा.
*संशयितांनी दागिने सावंतवाडी मोती तलावात फेकले?*
संशयित आरोपी हे अवैद्य दारूच्या धंद्यात पैशांच्या हव्यासापोटी, आकर्षणापोटी आले आहेत. मौजमजा करण्यासाठी अवैद्य धंद्यातून पैसा मिळू शकतो याची कल्पना असल्याने ते अशा अनैतिक धंद्यात गुंतले आणि या अनैतिक पैशांच्या मस्तीपोटीच त्यांनी खुनासारख्या प्रकाराला गुन्हेगारीमध्ये परावर्तित करत त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रकार केला आणि काहीच न घडल्यासारखे समाजात वावरत राहिले. असे पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळलेले हे तरुण दागिन्यांचे पैसे करण्यापेक्षा ते मोती तलावात दागिने फेकतील का? दागिने कुठेही लपवून ठेऊन आज ना उद्या त्याचे पैसे करता येतील हा विचार निर्ढावलेले संशयित करणार नाहीत का? दागिने खरे की खोटे याची सुद्धा शहानिशा संशयित आरोपींनी केली आहे, ती कोणाकडे केली? दागिने खोटे आहेत हे त्यांना कसे समजले? त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या आरोपींवर योग्य तो उपचार करूनच त्यांच्याकडून सत्य वदवून घ्यावे लागणारच. अन्यथा एक खून पचल्यास अशा निर्ढावलेल्या तरुणांकडून भविष्यात समाजात अजूनही गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संशयित आरोपींना पकडल्यावर त्यांना सोडविण्यासाठी, जामीन देण्यासाठी वकिलांची व्यवस्था कोणी केली? वकिलांची व्यवस्था करणाऱ्यांचा या खून प्रकरणात काय सहभाग आहे? याचा देखील पोलीस प्रशासनाने तपास करावा, त्यातूनही खुफिया माहिती पुढे येण्याची शक्यता आहे….
क्रमशः