You are currently viewing स्वीकार

स्वीकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन-रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्वीकार*

ते एक पीस अतिसामान्य
नव्हते इंद्रधनुष्यी रंग चमचमणारे
नव्हतं आकर्षक रूपही भुलवणारं
नव्हतं कोणी फिरवत गालावरून
नव्हतं कोणी वह्या-पुस्तकात ठेवत
ते झिडकारणं, ते उपेक्षिताचं जिणं
वाऱ्याबरोबर उडत होतं इकडून तिकडं
जणू गिरक्या घेत होतं नशीबच एखाद्याचं
म्हणूनच करत होतं स्वतःशीच खंत…

आणि अचानक मिळाला समर्थ आधार क्षणभर अविश्वासानं ते बावरलं, थरथरलं
‘मी कधीच अंतर देणार नाही तुला’
तू जसं आहेस तसंच प्रिय आहेस मला
सगळेच नसतात राजहंस, नसतात सगळेच कोकिळ…

पण हक्क असतो सगळ्यांना जगण्याचा, स्व-कर्तृत्व दाखवण्याचा
मान्य कर स्वतःचं अस्तित्व
स्वीकार कर स्वतःचा
दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं
रूपरंग चार दिवसांचे सोबती
गुणांचं कर्तृत्व जन्मभराची ठेव’

आणि आणखी एक…
आधाराच्या कुबड्या नकोत सदैव
स्वबळावर जगता यावं…
विश्वास ठेवावा स्वतःवर’

कर्ण-संपुष्टात साठवले ते अमृत शब्द
बळ मिळालं मनाला
थांबलं ते पाचोळ्यागत भिरभिरणं
पीस आश्वस्त झालं, सुखावलं…
आणि मग अतीव विश्वासानं तेथेच विसावलं…

पण……….
हे कणाकणानं तुटणं…?

छे! हे तुटणं नव्हेच…
हे तर स्वतःतील न्युनगंडाचे रज:कण वाऱ्यावर उधळणं…

आणि तुटणं असलंच तर…
हा आहे निसर्ग नियम
हळूहळू प्रवास करणं…अंताकडे
पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी…
ही मावळतीची संध्या ऊद्या उगवत्या उषेत परावर्तित होणार… तशीच

पण…सिद्ध करून स्वतःला…
होऊन स्वयंसिद्ध……..!

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा