देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मिळवला मान ; 24 जुलै रोजी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ
नवी दिल्ली :
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत.
राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.