You are currently viewing कणकवली शहर फिडरवरून सोनगेवाडीतील नागरिकांना वीज पुरवठा – समीर नलावडे 

कणकवली शहर फिडरवरून सोनगेवाडीतील नागरिकांना वीज पुरवठा – समीर नलावडे 

विविध समस्यांबाबत सोनगेवाडी नागरिकांची नगराध्यक्षांशी चर्चा

कणकवली

शहरातील सोनगेवाडी येथे गेली अनेक वर्षे लो होल्टेज व सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारापासून आता सोनगेवाडी वासियांची मुक्तता होणार आहे. कणकवली शहराला ज्या फिडरवरून विद्युत पुरवठा केला जातो त्या फिडरवरूनच सोनगेवाडी करिता विद्युत पुरवठा करण्याकरिता नगरपंचायत निधी देणार असल्‍याची ग्‍वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
शहरातील सोनगेवाडीतील नागरिकांनी तेथील विविध समस्यांच्या अनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक ॲड.विराज भोसले उपस्थित होते.सोनगेवाडीतील कमी दाबाचा वीजप्रश्‍न सोडविण्यासाठी नगरपंचायत निधीतून वीज खांब, वीज वाहिन्या आणि इतर साहित्‍य घेतले जाणार आहे.येत्या दोन दिवसात याचा सर्वे होऊन त्याला तातडीने मंजुरी देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सोनगेवाडी नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच सोनगेवाडीतील गार्डन करिता ही विशेष बाब म्हणून निधी देण्यात येणार असून लवकरच हे गार्डनही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात झालेल्‍या बैठकीला महावितरण चे सहाय्यक अभियंता सागर कांबळे, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षण विनोद सावंत, सतीश कांबळे, संदीप उंबळकर, विभव करंदीकर, राजु गवाणकर, लवू पवार, श्री. गावकर, सी आर चव्हाण, सुशील सावंत, शामा तेंडुलकर, एन बी चव्हाण, संतोष तवटे, बाळा पराष्ट्येकर, रुजाय चोडणकर, किसन दुखडें, सर्वेश गावकर, महेश कुडाळकर, आदि उपस्थित होते.
सोनगेवाडी करिता आचरा – देवगड फिडर वरून वीज पुरवठा केला जात आहे. हा वीज पुरवठा कणकवली शहराच्या फिडरवरून केला जावा याकरिता अनेक वर्षे पत्रव्यवहार केला. पण महावितरण कडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डीपीडीसी मध्ये देखील याबाबतचा प्रस्ताव पाठवला. परंतु कणकवली नगरपंचायत च्या प्रस्तावाला डीपीडीसीकडून देखील मंजुरी मिळालेली नाही. या संदर्भात नगरसेवक ॲड.विराज भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. नागरिकांची गरज व सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत या कामी नगरपंचायतने पुढाकार घेतल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यामुळे कणकवली शहरातील ज्यावेळी विद्युत पुरवठा काही कारणाने बंद होईल त्याचवेळी सोनगेवाडीतील विद्युत पुरवठा बंद होईल. इतर वेळी शहरात इतर भागांमध्ये होत असलेला पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा तसाच सोनगेवाडीमध्ये देखील सुरू राहील असे श्री नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =