You are currently viewing वारस (भाग १०)

वारस (भाग १०)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*

*वारस (भाग १०)*

शालूला चौथा महिना संपत आला होता. राघो तिची पूर्ण काळजी घेत होता. नोकरांना व्यवस्थित सूचना दिल्या होत्या. तरी तिला एखाद्या अनुभवी स्त्रीची गरज होती. राघो दूरच्या नात्यातील कुणालातरी बोलवायच्या प्रयत्नात होता.

“कुणालातरी परक्या स्त्रीला बोलावण्यापेक्षा आपण कामिनीलाच खाली बोलावले तर?”, राघोचा चांगला मूड पाहून शालूने विषय काढला.

“कामिनी?”, शालूने कामिनीची तरफदारी करावी हे राघोला मुळीच आवडले नाही.

“हे बघ राघो..कामिनी तुझी प्रथम पत्नी आहे, हे सत्य तर आपण नाकारू शकत नाही. आपल्या अडचणीच्या वेळेस तिची मदत नाही घायची तर कुणाची घ्यायची? माझ्या आधी तिने हे घर सांभाळले आहे. घरातील नोकर तिला ओळखतात..ती नोकरांना ओळखते. तसंही आपल्या इतक्या आनंदाच्या क्षणी घरात कुणीतरी हिरमुसलं रहाणं म्हणजे आपल्या आनंदाला दुःखाची काळी किनार जोडल्यासारखी वाटते. राहू दे की तिलाही थोडी खुश. जुईलाही चार नवीन कपडे घेऊन देऊ. म्हणजे तीही खुश. त्यांना महत्व दिल्यानेच उलट त्यांची नजर लागणार नाही.” राघो विचारात पडलेला पाहून तीच पुढे म्हणाली..”निरागस कन्येला देवीचे रूप मानतो आपण. कशाला देवीला नाराज करायचे? उगीच शाप वगैरे लागला तर..”

राघोला शेवटचं वाक्य काही पटले नाही. इतक्या भ्रूणहत्या झाल्या होत्या त्याच्या घरी पण बरकत कायम होती. अंधश्रद्धाळू तो नव्हताच! शालूच्या मनातील भीती सोडली तरी तिच्यासाठी म्हणून कामिनीला शालूची काळजी घेऊ देण्यात काही धोका नव्हता. एव्हाना कामिनीला आपल्याबद्दल पूर्ण कल्पना आल्याने ती उगीच वळवळ करणारही नाही. आताच्या घटकेला शालूचे प्रसन्न राहणे गरजेचे आहे. नंतरचे नंतर पाहू. त्याने विचार केला.

“ठीक आहे..मला फारसे पटले नाही पण तुझी इच्छा आहे न..कर तू मनासारखं! फक्त आनंदी रहा.”, तो तिला जवळ घेत म्हणाला.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा