भविष्यात नक्की काय होणार?
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन शिवसेनेतील ४० आमदारांसह शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पक्षाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्तेत आले. या सत्तांतराच्या राजकारणात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेमध्ये उभी फूट पडून एकनाथ शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक असे दोन वेगवेगळे गट तयार झाले. आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात देखील आमदार दीपक केसरकर समर्थक व उद्धव ठाकरे समर्थक अशी गटबाजी पाहायला मिळाली.
सोमवारी १८ जुलैला आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस होता. शिवसेनेचे कार्यकर्ते इन्सुली येथील दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांचा रविवारी वाढदिवस. नाना पेडणेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून इन्सुली येथील कट्टर दीपक केसरकर समर्थक नारायण उर्फ बबन राणे यांच्या निवासस्थानान जिक त्यांचेच चिरंजीव साई राणे यांच्या साई रिसॉर्ट येथे ठाकरे समर्थक दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने आमदार दीपक केसरकर समर्थक नारायण उर्फ बबन राणे, अशोक दळवी आदी ठाकरे समर्थक व आमदार केसरकरांच्या विरोधात सातत्याने टीका करणारे सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि इतर ठाकरे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे नाना पेडणेकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कट्टर शिवसेना ठाकरे समर्थक व शिवसेना शिंदे गट आमदार दीपक केसरकर यांचे समर्थक एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.
शिवसेनेचे इन्सुली येथील कार्यकर्ते व ठाकरे समर्थक समजले जाणारे नाना पेडणेकर हे काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक समजले जात होते. नारायण राणे हे आपले दैवत आहेत, असे म्हणणारे नाना पेडणेकर आमदार दीपक केसरकर गृहराज्यमंत्री, पालकमंत्री होताच राणेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. परंतु गेल्या काही दिवसात शिवसेनेमध्ये फूट पडून ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आणि नाना पेडणेकर यांच्यासारखे काही कार्यकर्ते शिवसेनेच्या ठाकरे गटात तर बहुसंख्य कार्यकर्ते आमदार दीपक केसरकर यांच्या गोटात सामील झाले.