You are currently viewing शिरोडा समुद्र किनारपट्टीची लाटांच्या तडाख्यामुळे धूप

शिरोडा समुद्र किनारपट्टीची लाटांच्या तडाख्यामुळे धूप

धूप प्रतिबंधक बंधारा तुटून गेल्याने समुद्राचे खारे पाणी बागायती सह वस्तीत आल्याने धोका

संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करावी

शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा वेळागर संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे यांची मागणी

वेंगुर्ले :

सध्या समुद्राचे रौद्ररूप शिरोडा समुद्र किनारपट्टी गिळंकृत करत आहे. किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा लाटांच्या तडाख्यामुळे तुटून गेला असून समुद्राचे खारे पाणी आता बागायती सह वस्तीतही घुसत असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, तरी संबंधित विभागाने वेळीच यावर उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अनर्थ घडेल अशी भिती शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा वेळागर संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे यांनी व्यक्त केली आहे.
दिवसेंदिवस शिरोडा वेळागर येथील समुद्र पुढे पुढे सरकत असून किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. अनेक सुरुची झाडे, माड तसेच विजेचे खांब गेल्या दोन वर्षात समुद्रा च्या तडाख्यामुळे वाहून गेले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी वेळागरवासीयांच्या मागणीनुसार तत्कालीन विधान परिषदेचे आमदार परशुराम उपरकर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून व शासन दरबारी आवाज उठवून शिरोडा किनारपट्टीवर दीड किलोमीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर केला होता. आणि साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा धुप प्रतिबंधक बंधारा घालण्यात आला. मात्र या बंधाऱ्याच्या जाळ्या तुटून गेल्या असून काळे दगडही लाटांच्या माऱ्यामुळे विस्कटून समुद्रात जात आहेत. परिणामी बंधारा पूर्णतः निकामी होत आहे.
*माड बागायतीसह किनाऱ्या लगतच्या कुटुंबीयांनाही धोका*
शिरोडा समुद्र किनाऱ्याला लागून आजू अमरे, समीर भगत, मदन अमरे, शुभदा लोकेगावकर, रुजारिया अल्फान्सो, प्रकाश भगत, सुरज भगत, आगुनी सोज यांच्या सह अनेकांची घर आहेत. समुद्र भरतीच्या वेळी आणि उधाणाच्या वेळी समुद्राचे रौद्ररूप किनारपट्टी भेदत वस्तीत घुसत आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या बाजूने व तुटलेल्या ठिकाणाहून समुद्राचे खारे पाणी थेट आता बागायती पर्यंत येऊ लागले आहे. त्यामुळे या नागरिकांच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या माड बागायतीचे नुकसान होत असताना यांच्या घरांनाही धोका निर्माण होत आहे.
*सुरुची झाडे, विजेचे पोल पडूनही शासकीय यंत्रणा गप्प*
गेल्या दोन वर्षात या किनारपट्टीला लागून असलेल्या एमटीडीसीच्या जमिनीतील अनेक सुरुची झाडे किनारपट्टी वर कोसळून झाडे वाहून गेली आहेत. तसेच किनारपट्टीवर विजेच्या लाईन साठी लावण्यात आलेल्या काही विजेचे पोल किनारपट्टीची धूप झाल्याने पडून नुकसान झाले. हे नुकसानी दरवर्षी वाढत आहे मात्र तरीही संबंधित शासकीय यंत्रणा गप्प आहे. आता तरी या यंत्रणेने जागे होऊन उपाययोजना करावी अशी मागणी आजू अमरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =