You are currently viewing कोकणचे लोकप्रिय दबंग आमदार दीपक केसरकर वाढदिवस अभिष्टचिंतन

कोकणचे लोकप्रिय दबंग आमदार दीपक केसरकर वाढदिवस अभिष्टचिंतन

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही वर्षे सर्वोंमुखी असलेले नाव म्हणजे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर…!
कोकणातील राजकारणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राजकीय शह देणारा जर कोण असेल तर ते केवळ दीपक केसरकर…! आमदार दीपक केसरकर यांचा राजकीय प्रवास म्हणजे यशाच्या शिखरावर जाणाऱ्या खडतर पायऱ्या…! शांत संयमी स्वभाव नि हसतमुख चेहरा असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर अनेकांनी स्तुती सुमने उधळली तरी त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या स्वभावाची, प्रत्येकाला विचारपूस करण्याच्या सवयीची खिल्ली देखील उडवली. परंतु दीपक केसरकर हे आपल्या मतदार संघातील आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करतच असतात आणि सर्वांना हात दाखवून हसतमुखाने त्यांचा निरोप ही घेत असतात. आमदार दीपक केसरकर हे युती सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री पदावर होते. परंतु स्वतः भ्रष्टाचारी नसल्यामुळे इतर सहकाऱ्यांकडूनही त्यांची तीच अपेक्षा असते. त्यामुळे दीपक केसरकर यांचे मित्र कमी व हितशत्रूच जास्त असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या कोकणावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि आपला सावंतवाडी मतदारसंघ यावर प्रेम करणारे दीपक केसरकर नेहमीच विकासाचे व्हिजन घेऊन कार्यरत असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात असो अथवा विधानसभेत असो वरिष्ठांकडून त्यांना कोकणचा विकास होण्यासाठी मदतीची अपेक्षा असते. समाजा मध्ये काम करताना वैयक्तिक स्वार्थाची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करण्याची दीपक केसरकर यांची वृत्ती…! दीपक केसरकर म्हणजे एक तळमळीचा कार्यकर्ता. सावंतवाडी शहरात त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात जिथे जिथे विकास कामे सुरू असायची, तिथे दीपक केसरकर सकाळच्या प्रहरी कामगार येण्याच्या अगोदर सुद्धा पोहोचलेले असायचे. त्यांच्या या तळमळीतून त्यांची कार्य करण्याची पद्धत आणि विकासात्मक दृष्टीच नेहमी दिसून येते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असूनही आपल्या मतदारसंघासाठी काहीही करता येत नसल्याची खंत नेहमीच दीपक केसरकर यांच्या चेहऱ्यावर दिसून यायची. शिवसेनेचा चाळीस आमदारांचा मोठा गट शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून वेगळा झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट व भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मास्टरमाईंड म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. शिवसेना शिंदे गटाची बाजू मीडियाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राच्या समोर मांडण्याची म्हणजेच शिंदे गटाचे प्रवक्ते पदाची जबाबदारी आमदार दीपक केसरकर यांनी लिलया पेलली. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दीपक केसरकर यांचे नाव कानाकोपऱ्यात पोचले. अगदी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दीपक केसरकर यांच्या हुशारी व अभ्यासू वृत्तीची दखल घेतली. सावंतवाडी मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेवर निवडून येत हॅट्रिक केलेले दीपक केसरकर हे एकमेव आमदार…! लोकांशी असलेला दांडगा जनसंपर्क, शांत संयमी स्वभाव यामुळे दीपक केसरकर यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केले आहे. विरोधकांनी कितीही राळ उठवली तरी आपल्या कार्याच्या जोरावर दीपक केसरकर प्रत्येक वेळी विरोधकांना शह देतात.
राजकारणाची एक पद्धतच आहे, जर राजकारणात पुढे जायचं असेल तर आपल्या विरोधकांना किंवा स्पर्धेत असलेल्या स्पर्धकाला मागे टाकल्याशिवाय पर्याय नसतो. काही वेळा हरलेला स्पर्धक “आपल्यावर पाय देऊन पुढे गेला” अशीही टिप्पणी करतो. परंतु राजकीय हित साधायचे असेल आणि जनकल्याण हा हेतू मनात असेल तर विरोधकांवर शिरसंधान साधून पुढे जाण्यातच शहाणपणा असतो… आणि हाच शहाणपणा आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात दाखवून दिलेला आहे. आपल्या राजकीय प्रवासात अनेक मोठमोठी पदे भूषवून देखील जमिनीवर पाय असणारे, सर्वसामान्य जनतेला अगदी रस्त्यावर सुद्धा भेटणारे आमदार दीपक केसरकर हे खरोखरच सर्वसामान्यांचे नेते आहेत. येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रीपदावर नक्कीच त्यांची वर्णी लागणार आणि दीपक केसरकर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाणार यात मात्र शंका नाही. आपल्या अक्कल हुशारीच्या आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांसहित स्वक्षीयांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.
असे हे कोकणचे शांत, संयमी स्वभावाचे अभ्यासू वृत्तीचे… तरीही धडाकेबाज लोकप्रिय नेतृत्व आमदार दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस…!
*आजच्या या शुभदिनी संवाद मीडियाकडून आमदार दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि भावी वाटचालीस सदिच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =