You are currently viewing वारस (भाग ७)

वारस (भाग ७)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*
*वारस (भाग ७)* –

“तू .. .अशी कशी…आणि जुई..काय झालं जुईला?”, तिने आत येऊन जुईच्या मानेला हात लावला.

“ओह माय गॉड! ही तर तापाने फणफणली आहे.” तिने कामिनीकडे पाहिले. कामिनी मान खाली घालून तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवू लागली.

“ताप किती आहे?”

“दोन-तीनपर्यंत असेल.” ती खालमानेनेच उत्तरली.

“असेल? तू मोजला नाहीस?” ती पुन्हा गप्प झाली.

“का मोजला नाहीस कामिनी?”, शालूच्या आवाजाला धार आली.

“माझ्याकडे थर्मामीटर नाही..”

“काय?”, शालूला अजूनच धक्का बसला. कामिनीच्या डोळ्यातील पाणी तिच्या नजरेतून सुटलं नाही. प्रथमच तिचे खोलीकडे लक्ष गेलं. खोलीत एक पलंग, दोन लाकडाच्या खुर्च्या, गॅस, काही भांडी, ६-७ डब्बे एवढंच सामान होतं. या व्यतिरिक्त भिंतीला चिकटलेलं एक दार नसलेलं लाकडाचं कपाट होतं, त्यात काही कपडे घडी करून ठेवले होते.

“काय आहे हे सगळं?” कामिनीबद्दल असूयेची जागा आता कणवने घेतली होती. ती दु:खी असावी, आपले सुख पाहून तिने जळावं असे तिला नेहमीच वाटत आले होते पण ती इतक्याही वाईट स्थितीत असावी, अशी कामना तिने कधीच केली नव्हती. राघोच्या बोलण्यातून तिने कामिनीची तयार केलेल्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध प्रत्यक्षातील कामिनी होती. असं कसं?

“माझ्या जुईला वाचवा ताई..!”, ती शालूच्या पाया पडली तशी शालू दोन पावलं मागे सरकली.

“ताई?? कामिनी..मी शालू आहे. तुझी मैत्रीण.. हे तुम्ही आम्ही काय लावलंय?” शालू अजूनही धक्क्यातून बाहेर आली नव्हती. राघोने कामिनीबद्दल खोटं का सांगितलं असावं? पण ही वेळ विचार करायची आणि विचारण्याची नव्हती. जुईकडे लक्ष द्यायला हवं होतं. ती तीरासारखी खाली गेली आणि थर्मामीटर घेऊन आली. जुईला ३ ताप होता.

“चल.. हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ..”

“नको ..नको.. तो माझ्या पोरीला मारून टाकेल..”, तिने पुन्हा शालूचे पाय पडकले.

“डॉक्टर कशाला जुईला मारतील..?”, तिने आश्चर्याने विचारले.

“डॉक्टर नाही..”

“मग..कोण?”

कामिनी काही न बोलता गप्प उभी राहिली आणि शालूच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कामिनी राघोबद्दल बोलत होती. आता मात्र शालूच्या डोळ्यात पाणी तरळलं.

“कमीत कमी फोनवर तरी बोलायचं नं डॉक्टरांशी..”

“फोन नाही माझ्याजवळ..”, कामिनीने खालच्या आवाजात सांगितलं.

“काय? मोबाइलही नाही तुझ्याजवळ?”

कामिनी मानेनच नाही म्हणाली. शालूला धक्क्यावर धक्के बसत होते. राघोने सांगितलेली कामिनी ही नव्हतीच. मग राघो खोटं का बोलला? ही वेळ विचार करायची नव्हती. तिनेच खाली जाऊन मोबाइल आणला. दूरच्या नात्यातील कुठल्यातरी डॉक्टरला फोन लाऊन औषध विचारली.

“म..माझ्याजवळ पैसे नाहीत. तुम्ही…तू देतेस का? मी तुझे उपकार…” कामिनीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत शालू तिथून निघून गेली.

थोड्याच वेळात औषध आली. माळी काकांनी आणून दिली. शालूने ती औषधं कामिनीच्या हवाली केली. राघो यायची वेळ झाली असल्याने तिला तिथे थांबणे शक्य नव्हते. ती घाईघाईत खाली आली. राघो आल्यानंतर गरगरल्यासारखे होत असल्याने निमित्त करून ती झोपली. परंतु कामिनीची अवस्था, जुईची चिंता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राघोचं खोटं बोलणं याने तिला झोप येईना. विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं. रात्री केव्हातरी तिचा डोळा लागला.

*(क्रमशः)*

प्रतिक्रिया व्यक्त करा