You are currently viewing माणसं जोडणारा प्रतिभावान साहित्यिक म्हणजे स्व.मधुसुदन नानिवडेकर :- प्रमोद जठार

माणसं जोडणारा प्रतिभावान साहित्यिक म्हणजे स्व.मधुसुदन नानिवडेकर :- प्रमोद जठार

*जेष्ठ कवी,गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचा प्रथम स्मृती दिन*

 

*तळेरे येथील दळवी महाविद्यालयात “मधुस्मृती” कार्यक्रमाचे आयोजन*

 

तळेरे : प्रतिनिधी

 

 

स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या सारखा अत्यंत थोर प्रतिभावंत साहित्यिकाचा सहवास मला लाभला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.जीवनात चांगले मित्र जोपासले तर ते आपल्याला उतूंग शिखरावर नेऊन ठेवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नानिवडेकर होते.आपल्या सोबत चांगला विचार करणारी मंडळी असली की जीवनात एक वेगळीच मजा येते.नानिवडेकर यांनी आपल्या चांगल्या स्वभावामुळे असंख्य माणसे जोडून त्यांचा सेतू बांधण्याचे काम केले.असे भावपूर्ण उद्गार माजी आमदार प्रमोद जठार यांनी काढले.

 

जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी, गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयामध्ये नानिवडेकर यांच्या स्मृतीचा जागर जागवण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी “मधुस्मृती” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. जठार बोलत होते.

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय, तळेरे आणि प्रज्ञांगण परिवार, संवाद परिवार-तळेरे व श्रावणी काॅम्प्यूटर, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ कवी, गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधुन दळवी महाविद्यालय, तळेरे येथे “मधुस्मृती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानिवडेकर यांचे अत्यंत जवळचे मित्र माजी आम. प्रमोद जठार होते. तर विशेष अतिथी म्हणून संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष व दै.पुढारीचे जिल्हा आवृत्ती प्रमुख गणेश जेठे होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ राष्ट्रीय कामगार नेते तथा ओझरमचे सुपुत्र विद्याधर राणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, वामनराव महाडिक विद्यालय तळेरेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, उपसरपंच दिनेश मुद्रस, प्रा.हेमंत महाडिक हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी,सर्व प्राध्यापक व साहित्य रसिक उपस्थित होते.

 

*होय, आम्ही होणार वारसदार- प्रमोद जठार*

याप्रसंगी बोलतांना प्रमोद जठार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आंतर व बाह्य प्रेरणा जागृत ठेऊन आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे हे ओळखता आले पाहिजे. फार श्रीमंतांची मुले फार मोठी होत नाहीत. जगातील सर्व माणसांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. गरीबी हा शाप नसून ती संधी समजा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार.जीवनात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. नानिवडेकर यांनी जीवनात सर्व प्रकारची खूप दु:खे सोसली. पण त्यांनी हार न मानता त्यांना समोरे गेले. अपयशालाही नलाजता हासत हासत सामोरे गेले पाहिजे.

कोकणातील माणसांमध्ये प्रचंड बुध्दीमत्ता ठासून भरलेली आहे. खडतर मेहनतीने यश मिळते. नानिवडेकर यांचा हा वारसा पुढे नेण्याची ताकद आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. मधुस्मृती हे अत्यंत समर्पक नाव ठेऊन नानिवडेकर यांच्या स्मृती जपून त्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य हाती घेण्याची गरज प्रमोद जठार यांनी व्यक्त केली. तसेच मधुस्मृती या अत्यंत चांगल्या आयोजना बद्दल आयोजकांचे कौतुक केले.

*कै. मुधुसुदन नानिवडेकर यांच्या नावाने प्रतिवर्षी पुरस्कार..*

मधुस्मृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नानिवडेकर यांनी जोपासलेला वारसा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेऊन तळेरे सारख्या गावामध्ये ही मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याबद्दल प्रमोद जठार यांची या चळवळीसाठी पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करुन यातून स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ साहित्य क्षेत्रातील व्यक्तीला दरवर्षी त्यांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, तसेच त्यांचा वारसा जोपासण्यासाठी साहित्य विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात तसेच अन्य उपक्रम घेण्यासाठी ही रक्कम देण्याचे मान्य केले.

 

*गझल हे त्यांचे पॅशन होते :- डॉ.मिलिंद कुलकर्णी*

 

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मधुसूदन नानिवडेकर यांच्या आठवणी जागवितांना म्हणाले की, नानिवडेकर यांना जन्मजात साहित्याचं देणं लाभले होते. सुरेश भटांच्या सान्निध्यात राहिले. चांगल्या माणसांना गुंफण्याचे काम त्यांनी केले. कायम इतरांचे कौतुक करीत असतं. नवोदीत कवींना प्रेरणा दिली. त्यांच्या स्वभावातील गोडवा, गालावरील सुंदर उमटणारी खळी सतत हसतमुख चेहरा आणि स्वभावातील गोडवा, माधुर्य तसेच सगळ्यांविषयी चांगले बोलणे, वागणे हा त्यांचा स्वभाव गुणधर्म होता. माणसे जोडत राहणे, आनंद वाटण्याचे त्यांनी जीवनात काम केले. असंख्य दु:ख, यातना, विवंचना सोसल्या परंतु त्याचा किंचितही लवलेश चेहऱ्यावरती उमटू दिला नाही. त्यांच्या प्रचंड चांगल्या ओळखी होत्या आणि दांडगा उत्साह होता. गझल हे त्यांचे पॅशन बनले होते. चालते बोलते जणू विद्यापीठच होते. नाजूक संवेदनशील जवळच्या मित्राला मुकल्याची खंत डॉ.कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

 

*नानिवडेकरांच्या दै.पुढारीतील शुन्यप्रहर ला विशेष वाचक वर्ग*-गणेश जेठे

दै. पुढारीत कार्यरत असताना मधुसूदन नानिवडेकर हे ‘शून्यप्रहर’ या नावाने सदर लिहित असत या सदराला विशेष असा वाचक वर्ग होता. त्यांचे चौफेर पण, सौम्य भाषेत लेखन वाचकांना आवडत असे अशा नानिवडेकरांच्या अनेक आठवणी या निमित्ताने अतिथी गणेश जेठे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना कथन केल्या.

त्यानंतर विद्याधर राणे यांनी नानिवडेकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर प्रमोद जठार व दळवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गझल व कवीता सादर करुन यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नानिवडेकर यांना अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रमोद जठार यांच्या हस्ते नानिवडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ.मिलिंद कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय निकेत पावसकर यांनी तर स्वागत संजय खानविलकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणाली मांजरेकर हीने केले आणि शेवटी आभार दत्तात्रय मारकड यांनी मानले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सतीश मदभावे, प्रमोद कोयंडे, संजय खानविलकर, सौ.श्रावणी मदभावे, प्रा.हेमंत महाडीक आणि दळवी महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + seventeen =