You are currently viewing स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी ध्वज उपलब्ध करावेत

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी ध्वज उपलब्ध करावेत

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट कालावधीत स्वराज महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी व्यापारी महासंघाने तिरंगा ध्वज उपलब्ध करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. व्यापारी महासंघा बरोबर आज बैठक घेण्यात आली.

                या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधुत तावडे, एनआरएलएमचे जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार यांच्यासह व्यापारी महासंघाचे कार्यवाहक नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, शार्दुल घुर्ये, अनिकेत नेवाळकर आदी उपस्थित होते.

                जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याला लागणाऱ्या तिरंग्याची उपलब्धता व्यापारी महासंघाने करावी. त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या मार्फत तसेच व्यापारी महासंघानेही आपल्या मार्फत सदर तिरंगे विक्रीसाठी उपलब्ध ठेवावेत. त्यासाठी जिल्हास्तरावर समन्वयक नेमण्यात आले आहेत. हा उपक्रम सर्वांनीच यशस्वी करावा, असेही त्या म्हणाल्या.

                ध्वज संहितेच्या निकषानुसार ध्वज बनवण्यात यावेत. त्याचा सन्मान राखला जाईल याचीही दक्षता सर्वांनी घ्यावी असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा