जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
तुझा चंदनाचा टीळा माझ्या कपाळी येऊ दे
तुझ्या मुखातली देवा मज भुपाळी होऊ दे …
देई सद् गुणांचे दान सारी किल्मिषे घालव
तुझ्या कृपाप्रसादाने मला फुटू दे पालव
सेवा घडावी हातून देवा माझ्या काहीतरी
कर चमत्कार असा मला चाकर होऊ दे ….
किती करतोस देवा तरी कसे रे उपाशी
तुपासवे खाऊनही आम्ही सारेच अधाशी
काम क्रोध देऊन तू सारी घालवली रया
सद् गुणांची झाली माती आणि विटाळली काया
घाल फुंकर अशी की मला बांसरी होऊ दे …
देणे अमाप तुझे रे नाही कुठेच तू उणा
किती कृतघ्न आम्ही रे वाटे आमचीच घृणा
तुझे अपार वैभव तुझी अपार करूणा
कृतज्ञतेचे ते दान देई मानवास पुन्हा
गुणगाण गाण्या तुझे..मला पाखरू होऊ दे ….
वरदान सद् बुद्धिचे माझे वाढव रे गुण
माझ्या मनात वाजू दे तुझ्या नामाचीच धून
पाडू नकोस विसर नको जाऊ कधी दूर
तुझ्या वाचून रे देवा सारे धुसर धुसर
शाश्वताचा ठेवा तूच तुझा भाट मी होऊ दे ….
तुझा चंदनाचा टीळा … माझ्या ….
कपाळी येऊ दे …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ डिसेंबर २०२१
वेळ : सकाळी ९:४७