You are currently viewing हायवे चौपदारीकरणातील समस्यांबाबत लोकांचे बळी गेल्यानंतरच खासदारांना जागं येते हे दुर्दैव..!

हायवे चौपदारीकरणातील समस्यांबाबत लोकांचे बळी गेल्यानंतरच खासदारांना जागं येते हे दुर्दैव..!

राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचीच प्रचिती..!

 

खासदार महोदयांनी मागील दोन वर्षांत केलेले हायवे पाहणी दौरे व बैठकांमधून काय निष्पन्न झाले हे जाहीर करावे…मनसेचे आवाहन

 

सिंधुदुर्ग :

 

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण उपक्रम चालू झाल्यापासून हायवे बाबतच्या बहुतांश समस्या अद्यापही तशाच प्रलंबित आहेत. ठेकेदार कंपनीच्या ढिसाळ व नियोजनशून्य कामामुळे होणारे रोजचे अपघात व त्यातून लोकांचे जाणारे हकनाक बळी पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पूर्णपणे निष्क्रिय बनले आहेत की काय असे भासत आहे. अगदी काल-परवा कणकवली व कुडाळ मधील झालेले अपघात पाहता ते ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाचेच बळी असून त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणारे खासदार विनायक राऊत अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळणार का याबाबत चकार शब्दही बोलले नाहीत. मागील दोन वर्षांच्या काळात अशा आढावा बैठका घेऊन हायवे प्रकल्पग्रस्तांचे व हायवेबाबत समस्यांचे असे कोणते प्रश्न आपण निकाली काढलेत हे ही जनतेसमोर जाहीर करावेत.मुळात लोकांचे जीव गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन जागं येणार असेल तर हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.हायवेवर साचणारे तलाव,वाहून येणारा चिखल अपघातांना निमंत्रण देत असून नुसत्या बैठका घेऊन प्रश्न सुटणारे नाहीत.पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांमुळे हायवेवर दररोज असंख्य छोटे मोठे अपघात होत असून “टोल” चा मलिदा डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कारभार करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील नादान लोकप्रतिनिधींचा खऱ्या अर्थाने आत्मा जागा होण्याची गरज आहे अशी टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − eight =