You are currently viewing सावंतवाडी विठ्ठल मंदिरातील “कार्तिकी स्नान” उत्सवाची आज सांगता

सावंतवाडी विठ्ठल मंदिरातील “कार्तिकी स्नान” उत्सवाची आज सांगता

सावंतवाडी

येथील विठ्ठल मंदिरात अडीचशे वर्षे परंपरागत सुरू असलेल्या “कार्तिकी स्नान” उत्सवाची आज सांगता करण्यात आली. दरम्यान या उत्सवाच्या सांगतेसाठी श्रींची पालखी शहरातील काही मंदिरांना भेटी देत भटवाडी येथील विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. त्या ठिकाणच्या तळीत स्नान झाल्यानंतर ती पालखी पुन्हा शहरातील विठ्ठल मंदिराकडे रवाना झाली.दरवर्षी कार्तिक महिन्यात कोजागिरी पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात हा उत्सव चालत असतो. याबाबतची माहिती माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी दिली.

ते म्हणाले, या उत्सवाला दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा लाभली आहे. कोजागिरी पौर्णिमे पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत एक महिन्याच्या कालावधीत येथील विठ्ठल मंदिरात “कार्तिकी स्नान” उत्सव पार पडतो. या उत्सवाच्या सांगतेवेळी श्रींची पालखी शहरातील विविध मंदिरांना भेटी देते त्यानंतर भटवाडी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन त्याठिकाणी असलेल्या तळीत देवांचे स्नान होते. व त्यानंतर पुन्हा ही पालखी विठ्ठल मंदिरात रवाना होते. दरम्यान सायंकाळी भजन कीर्तन व काल्याने या कार्यक्रमाची सांगता होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा