You are currently viewing अस्तित्व ….

अस्तित्व ….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

अस्तित्व, किती मूलभूत शब्द आहे हा! किंबहुना जीवनाचे
सारच म्हणा ना! अहो, चराचरातून हाच हुंकार ऐकू येतो
अस्तित्वाचा, मी आहे, मी आहे, मला जगायचे आहे..
अगदी अश्म युग काय किंवा नंतरचा संस्कृती निर्माण होण्याचा
काळ काय? माणसाची जगण्याची व आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड चालू आहे. अगदी किडा मुंगी सुद्धा
ज्यांचे जीवन मूल्य फार कमी आहे, जगण्याची कोणतीच शाश्वती नाही ते सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रचंड धडपड करत असतात.आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे.

अगदी सुरूवातीला जेव्हा माणूस रानटी अवस्थेत होता,
तेव्हा टोळी युद्ध होत असे. दोन टोळ्यांमध्ये प्रचंड मारामाऱ्या
खुनाखुनी होऊन प्रचंड रक्तपातही होत असे. व विजयी टोळी
पराजित टोळीचा नायनाट करत असे. स्रियांची स्थिती तर
अत्यंत भयावह होती. त्यांना उपभोगून मारून टाकले जाई,
इतका माणूस क्रूर होता.ही सुद्धा त्यांच्या परीने अस्तित्वाचीच
लढाई होती. मला जिवंत रहायचे आहे, माझ्या आड कोणी
आल्यास त्याला मी संपवणार व मीच जगणार !
ह्याच काळात ऋषिमुनिंनी हळू हळू आश्रम स्थापन करून
माणूस घडवण्याचे व सर्वांचे अस्तित्व टिकवण्यासाठी
त्यांना सुसंस्कृत करण्याचे प्रयत्न सुरू केले कारण तो पर्यंत
तो अतिशय क्रूर व रानटी होता. अशांना माणूस म्हणून घडवणे
सोपे काम नव्हते.त्या साठी साम दाम दंड भेद या साऱ्यांचा
वापर करावा लागे कारण खुद्द ऋषीमुनींच्या जीवाला ही धोका
असे. ह्या टोळ्या केव्हा हल्ला करतील याचा नेम नसे.

 

प्रवासा साठी रथ किंवा पायी चालणे हीच साधने होती.
मग अगदी उत्तरेतून जमदग्नी व रेणुका नर्मदा तिरी वास्तव्यास
आले व त्यांनी माणसाला माणूस बनवण्याचे काम सुरू केले.
त्यामुळे त्यांना अगदी उंचावरती सतत सजग व शस्रसज्ज
रहावे लागे. त्यांनी ह्या रानटी माणसांना हळू हळू जमिन कसणे, पेरणी करणे, धान्य उगवणे, दूध काढणे इ. गोष्टी
शिकवायला सुरूवात केली व ती त्यांच्या पचनी पडून माणूस
धान्य पिकवू लागला. शेतात राबू लागला. यज्ञ करू लागला.
त्याला धर्म माहित झाला. व तो बऱ्यापैकी माणूस बनला.

 

समुहाचे अस्तित्व व माणसाचे अस्तित्व वेगवेगळे असते.
समुहात राहून ही माणसाला स्वत:चे वेगळेपण व अस्तित्व
टिकवायचे असते. समुहाला चेहरा नसतो पण व्यक्तिला
चेहरा असतो. मी मी आहे, माझी स्वत:ची अशी ओळख
आहे, महत्व आहे, अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपतांनाच
संघर्षाचे प्रसंग उद् भवतात. ही अस्मिता कोणी झुगारायचा
प्रयत्न करताच व्यक्तिव्यक्तींमध्ये समाज समाजात व राष्ट्रा
राष्ट्रात प्रचंड संघर्ष पेटतो. पशु पक्षी प्राणी यांत सुद्धा असे
अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष होतांना आपण पाहतो. हो,
हत्तींचा ही आणि पक्ष्यांचाही म्होरक्या असतो. त्याच्या आज्ञेत
सारे वागतात ही हत्तीची व कळपाची अस्मिता आहे.म्हणून मी
म्हटले की चराचरात ही अस्मिता व अस्तित्व टिकवण्या साठी धडपड चालू असते.

 

प्रत्येकालाच त्या साठी लढा द्यावा लागतो मग ते स्री स्वातंत्र्य
असो वा राष्ट्रा राष्ट्रातील सीमा वाद असो. कारण झगडा
अस्तित्वाचा असतो. अगदी आपल्या घरात सुद्धा आपला बाळ
हटून बसतो तेव्हा ही तो त्याच्या अस्मितेचा व अस्तित्वाचा प्रश्न असतो. माझे ऐका, माझा हट्ट पुरवा कारण मी ही महत्वाचा आहे.
बघा, बालका पासून ते राष्ट्रा पर्यंत ही अस्मिता कशी काम
करते. प्रत्येकालाच त्या साठी झगडा करावा लागतो तो
पुराण कालापासून आजतागायत चालूच आहे. स्रियांचे
प्रश्न तर संपलेच नाहीत व संपणार ही नाहीत कारण तिच्या
अस्तित्वालाच म्हणावी तशी किंमत नाही.स्रियांना पुराण कालापासून आजतागायत आपल्या अस्तित्व व अस्मितेसाठी
झगडा द्यावा लागतो आहे हे आपण नाकारूच शकत नाही.
अगदी सुखाने जगता यावे व आपले अस्तित्व टिकावे म्हणून
माणसाच्या अनंत धडपडी चालू असतात.अगदी मान थरथरायला लागली तरी आपल्याला मारायचे नसते कारण
आपले अस्तित्व आपल्याला संपवायचे नसते. मला जगायचे
आहे हाच आपला नारा असतो.

 

थोडक्यात विश्वभर अस्तित्वाचा झगडा चालू आहे.प्रत्येक
माणूस,समाज, राष्ट्र आपले अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत
आहे आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे.फक्त ह्या अस्तित्व
टिकवण्याच्या धडपडीत त्याने त्याचे माणूसपण विसरता कामा नये, म्हणजे प्रश्न वाढणार नाहीत एवढी अपेक्षा करू या.

आणि हो , नेहमी प्रमाणे ही फक्त माझी मते आहेत.

॥धन्यवाद॥

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ५ जुलै २०२२
वेळ रात्री ११ : २७

प्रतिक्रिया व्यक्त करा