मेस्त्री कुटुंबीयांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार
मालवण :
मालवण तालुक्यातील तिरवडे येथील सुभाष सीताराम मेस्त्री हे गँगरीनच्या आजराने त्रस्त होते. त्यांच्या पायावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शस्त्रक्रियेसाठी मेस्त्री कुटुंबियांना ७ लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र आ. वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार हिंदुजा रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत करून दिली. याबद्दल मेस्त्री कुटुंबियांनी आ. नाईक यांचे आभार मानले आहेत.
श्री. मेस्त्री यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्या नंतर श्री. मेस्त्री यांना आमदार वैभव नाईक यांनी हिंदुजा रुग्णालय येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी या शस्त्रक्रिये करिता एकूण ७ लाख रुपये एवढा अंदाजित खर्च असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. सदर शस्त्रक्रिया करण्याकरिता एवढा खर्च करणे श्री. मेस्त्री यांना शक्य नव्हते. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे श्री. मेस्त्री यांचे आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देऊन सदर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून देण्याची मागणी केली. अखेर आमदार वैभव नाईक यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सात लाख खर्च असलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याचे आदेश हिंदुजा रुग्णालयास दिल्यानंतर मेस्त्री यांचे पायाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
शस्त्रक्रिया मोफत करून मेस्त्री कुटुंबियांना यामधून यशस्वीरित्या बाहेर काढण्याकरिता सहकार्य केल्याने मेस्त्री कुटुंबीयांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. मेस्त्री यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे हिंदुजा रुग्णालयास आदेश दिल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.