You are currently viewing पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम दाखल

पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम दाखल

नागरिकांनी सतर्क राहून स्वतःसह पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, नदी पात्रात जावू नये –  जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

 पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या 22 जवानांची एक टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी नदीपात्रात जावू नये, सतर्क राहून स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांची बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, मालवण तहसिलदार अजय पाटणे आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाल्या, पुढील तीन दिवसात जिल्ह्यात रेड अलर्ट असल्यामुळे पूर्व सुरक्षितता म्हणून 22 जवानांची एनडीआरएफची एक टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. टीमच्या मागणीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे. ज्या ठिकाणी कच्ची घरे, पक्की घरे, गोठ्यांची पडझड झाली असेल त्याचे पंचनामे तात्काळ करा. जिल्ह्याच्या पालक सचिव वल्सा नायर या उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आपत्कालीन स्थितीबाबत, पूर्वतयारी बाबत त्या आढावा घेणार आहेत.

            नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता वाटल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या 02362-228847 तसेच टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क करावा. देवगड तालुक्यातील पेंडरी येथील 3 कुटुंबातील 26 जणांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांच्याच दुसऱ्या घरात स्थलांतरीत केले आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ अथवा पाणी आलेल्या ठिकाणी तसेच समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये.

            स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवनार नाही याबाबत काळजी घ्यावी. सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. नागरिकांनीही स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा