मिशन आय ए एस चेआधारस्तंभ प्राचार्य अण्णासाहेब हिवसे.
विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी ही आपल्या अमरावती भागातील महत्त्वाची शैक्षणिक संस्था. या संस्थेचे माजी कोषाध्यक्ष व प्राचार्य श्री अण्णासाहेब हिवसे हे मिशन आयएएसचे संस्थापक अध्यक्ष. आज अण्णासाहेब आमच्यात नाहीत. पण अण्णा साहेबांनी मिशन आय.ए.एस.उभे करण्यामध्ये जो हातभार लावला तो फारच महत्त्वाचा आहे .मिशन आयएएस पूर्वी खरं म्हणजे मी साहित्यिक चळवळीत होतो. सन २०००मध्ये श्री अभिनय कुंभार, श्री अमोल पाटील,तुकाराम जाधव,प्रवीण चव्हाण, मल्हार पाटील या पुण्याच्या युनिक अकादमीच्या युवकांशी परिचय झाला आणि त्यातून निर्मिती झाली ती मिशन आयएएसची .मिशनच्या मदतीला सर्वप्रथम धावून आले ते अण्णासाहेब. ते तेव्हा विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष होते .त्यांनी त्यांच्या सर्व महाविद्यालयांची सगळी दारे आमच्यासाठी मोकळी केली. त्या काळात अण्णा साहेबांनी आम्हाला जी साथ दिली ती फारच महत्त्वाची ठरली. अण्णासाहेबांचा स्वभाव सर्वांना घेऊन चालणारा होता. प्रत्येकाला त्यांनी मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला .मिशन आयएएससाठी तर त्यांनी तन मन धनाने मदत केली. खरं हिवसे परिवार आणि विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी यांचा माझा जुना ऋणानुबंध होता तो सुरेश भटांमुळे . प्राचार्य राम मेघे,प्राचार्य राजाभाऊ देशमुख, रामदास धांडे ज्यांच्याकडे माझी बस उठ होती. राम मेघे साहेबांचे एक पुस्तकही मी संपादित करून प्रकाशित केले होते .पण सर्वात जास्त जवळ आले ते अण्णासाहेब. कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हणजे बराच खर्च असतो. पण या सगळ्याचा भार अण्णासाहेब स्वतः उचलायचे. मला आठवते गाजलेले आय ए एस अधिकारी श्री विकास खारगे हे तेव्हा यवतमाळला जिल्हाधिकारी होते .मी नुकताच आयएएस झालेले श्री अभिनय कुंभार यांना भेटून आलो होतो. एक भव्य कार्यशाळा आम्हाला घ्यायची होती. मी अण्णा साहेबांना पूर्ण कल्पना दिली .अण्णासाहेबांनी त्यांच्या अमरावती येथील वडाळी भागातील दंत महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्याची सूचना केली .अमरावती शहरातील स्पर्धा परीक्षेच्या जगतातील हा पहिला कार्यक्रम. त्यासाठी सांगलीवरून श्री अभिनय कुंभार आले. ते नुकतेच आयएएस झालेले होते. उद्घाटनासाठी श्री विकास खारगे आले व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त श्री धनराज खामतकर आले. १२मे २००० हा तो दिवस. या दिवशी मिशन आयएएसची रितसर सुरुवात झाली. आम्ही अण्णासाहेबांना अध्यक्ष केले. पहिला कार्यक्रम सकाळी नऊला सुरू झाला आणि रात्री नऊला संपला. अमरावतीच्या इतिहासामध्ये 12 तास चाललेला हा पहिला व शेवटचा कार्यक्रम . तेव्हा अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जनजागृती नव्हती.मला स्पर्धा परीक्षा आयएएस हा विषय पटला आणि म्हणून मी माझ्या साहित्यिक जगताला रामराम ठोकून स्पर्धा परीक्षांकडे वळलो. यामध्ये मला अध्यक्ष म्हणून खरी साथ दिली ती अण्णा साहेबांनी .त्यांची गाडी माझ्या ताब्यात असायची. त्यांची सगळी महाविद्यालय आम्ही पिंजून काढली. बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय .अण्णा साहेबांनी तिथे कार्यक्रम ठेवायला सांगितला. मला मनातून ते ठिकाण गावापासून दूर वाटत होते. पण अण्णासाहेब म्हणाले मुलं नक्की येतील .अण्णा साहेबांनी 200 मुलांची जेवणाची ऑर्डर देऊन टाकली. मी अण्णासाहेबांना म्हणालो की अण्णासाहेब एवढे मुले येणार नाहीत. अण्णासाहेब म्हणाले काठोळे नक्कीच येतील. खरं म्हणजे त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव होता. नेमकं कार्यक्रमाच्या दिवशी रिमझिम पाऊस सुरू झाला आणि माझी खात्री पटली की 200 लोकांची आपण जेवणाची ऑर्डर दिली .आता पाऊसही सुरु झाला आहे.आता मुले येणार नाहीत. परंतु तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या वातावरणास सुरुवात झाली होती. रिमझिम पाऊस असतानाही आणि अभियांत्रिकी महाविद्यालय बडनेरा गावापासून दूर असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आले कीआम्हाला 300 लोकांचा स्वयंपाक करावा लागला. तेव्हा काही कॅटरर्स वगैरे फारसे नावलौकिकाला आलेले नव्हते. अण्णासाहेबांच्या एका जवळच्या मित्राने ही सगळी व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली होती. अण्णासाहेबांचा माझा परिचय ते बडनेऱ्याच्या आरडीआयके महाविद्यालयात प्राचार्य असताना पासून झाला. आमचे कवी संमेलने त्यांच्या महाविद्यालयामध्ये घ्यायचे .अण्णासाहेबांना यामध्ये आवड होती .कारण की ते सुरेश भटांचे मित्र होते. गावात जर मिर्झा रफी अहमद बेग आला आणि अण्णा साहेबांना फोन केला तर अण्णासाहेब लगेच कार्यक्रम ठेवायचे. अण्णासाहेबांनी कधी नाही म्हटले नाही. पुढे मला आठवते बडने-याच्या आरडीआयके महाविद्यालयामध्ये मराठीची जागा निघाली .माझे मित्र श्री सतेश्वर मोरे यांनी अर्ज दाखल केला. त्यांना कोणीतरी सांगितले की अण्णासाहेब हे काठोळे सरांचे मित्र आहेत. सतेश्वर माझ्याकडे आला. जागा राखीव होती. त्याला घेऊन अण्णासाहेबांकडे गेलो .अण्णासाहेबांना सुरुवातीपासून साहित्याची एक रसिक म्हणून आवड होतीच. सतेश्वर तेव्हा अमरावती शहरात नावलौकिकास येत होता. प्राध्यापकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे हे मी अण्णा साहेबांना सांगितले आणि अण्णासाहेबांनी शब्द दिला आणि तो पाळला. आज सतेश्वर आमच्यात नाही .पण तो जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा तेव्हा आठवणीने अण्णा साहेबांची विषयी कृतज्ञता व्यक्त करायचा .आज मिशन आयएएस संपूर्ण भारतात 23 राज्यात काम करीत आहे .तेव्हा आमच्याजवळ कार्यालय देखील नव्हते.तेव्हा अण्णासाहेबांचे घर हे आमचे कार्यालय होते. अण्णा साहेबांचा फोन हा आमचा फोन होता. अण्णा साहेबांची गाडी ही आमची गाडी होती. त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही आणि तो त्यांचा स्वभावही नव्हता. कोणी पाहुणे आले तर आम्ही अण्णासाहेबांकडे घेऊन जायचं .आदरतिथ्य करण्यामध्ये त्यांचा नावलौकिक होता .आम्हाला कुठलेही पुस्तक छापायचे असले म्हणजे आम्ही अण्णासाहेबांना पुस्तकाचे बजेट सांगायचे .पुस्तकांच्या छापण्यासाठी आणि मदत करण्यासाठी अण्णासाहेबांनी कधी नकार दिला नाही .तेव्हा त्यांचे मित्र मंडळ सतत आमच्या पुस्तक प्रकाशनाला सातत्याने मदत करत होते. पुढे आमचे काम वाढले .तोपर्यंत दंत महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय महिला महाविद्यालय आर डी आय के महाविद्यालय या सगळ्या महाविद्यालयामध्ये आमच्या कार्यशाळा झाल्या होत्या. पण आता स्पर्धा परीक्षेकडे एवढा विद्यार्थ्यांचा कल वाढला होता की मग आमचे कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये व्हायला लागले. आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते आमच्या संस्थेचे कार्यक्रम जेवढे सांस्कृतिक भवनमध्ये झाले तेवढे कोणत्याही संस्थेचे झाले नाही. याचे कारण म्हणजे अण्णासाहेब .ते म्हणायचे काठोळे आपण आयएएसचे काम करीत आहोत .आता येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. आपल्या महाविद्यालयाचे सभागृह कमी पडत आहे .तुम्ही सांस्कृतिक भवन बुक करून टाका आणि सांस्कृतिक भवनची बुकिंगचे रक्कम माझ्या हवाली करायचे .आज आम्हाला आठवते आम्ही अनेक आयएएस टॉपर मुलांचे सत्कार घेतले ते सांस्कृतिक भवनामध्येच .दहा दहा दिवसांची स्पर्धा परीक्षा शिबिरे घेतली ती सांस्कृतिक भवनामध्येच आणि या कामासाठी अण्णासाहेब पितामह म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिले .आज अण्णासाहेब आमच्यामध्ये नाहीत. पण त्यांनी मिशन आयएएसला भक्कमपणे आर्थिक आधार देऊन आमची पाळंमुळं पक्के केलेली आहेत.
त्या काळात आम्हाला गरज होती त्या काळात खतपाणी घालण्याचे काम अण्णा साहेबांनी प्रामाणिकपणे केले आहे .आजही श्री नितीनभाऊ हिवसे हे अण्णासाहेबांचा वारसा पुढे चालवीत आहेत. नितीन भाऊ सहकारी चळवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यामध्ये काम केलेले व्यक्तिमत्व .पण त्यांच्याकडे कुठले काम घेऊन गेलो तरी ते लगेच करणार .कारण अण्णासाहेबांचे व माझे काय ऋणानुबंध होते ते त्यांनी फार जवळून पाहिलेले आहे .आज अण्णासाहेब आमच्यात नाहीत. परंतु मिशन आयएएसच्या रूपाने त्यांनी अमरावती शहराला नव्हे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या एका चळवळीची पायाभरणी भक्कम करण्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे .अशा या सामाजिक जाणीव असलेल्या व अमरावती शहराच्या शैक्षणिक सामाजिक विकासास हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आज जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
==============
*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे*
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती कॅम्प 9890967003