You are currently viewing मनविसे नेते अमित ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद

मनविसे नेते अमित ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद

संघटनेची नवीन रचना करणार असल्याचे केले स्पष्ट

सावंतवाडी :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान आज कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच सिंधुदुर्गात सकाळी धडकले. सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात श्री. अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला आणि जिल्ह्यात मनविसे भक्कम कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तिथेच त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.

अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील शेकडो मनसे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिक यांनी गर्दी केली होती. चांगलं शिक्षण घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना गोव्यात नोकरीसाठी जावं लागतं, सिंधुदुर्गात पुरेशा रोजगार संधी उपलब्ध नाहीत असा मुद्दा काही तरुणांनी अमित ठाकरे यांच्याशी चर्चा करताना मांडला. तर, येत्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसे कार्यकारिणी युनिट स्थापन करण्यात येईल, असा शब्द विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांना दिला.

संवाद बैठकीच्या प्रसंगी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी बोलताना श्री. अमित ठाकरे यांनी राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, दुपारचे जेवण घेताना स्थानिक पत्रकार आणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्यासह त्यांनी जेवणाच्या टेबलवर अनेक विषयांवर मनसोक्त अनौपचारिक गप्पा मारल्या.

सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ” मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सांगता येत नाही ” अशी तक्रार खंत श्री. अमित ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर ” आता यापुढे तुम्ही माझ्या थेट संपर्कात राहू शकता. तुम्हाला गरज पडली तर कधीही माझी वेळ घेऊन राजगड मुख्यालयात येऊन मला भेटू शकता ” असं स्पष्ट आश्वासन श्री. अमित ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिलं.

सावंवाडीतील संवाद बैठकीच्या वेळी पक्षाचे सरचिटणीस श्री. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, शहराध्यक्ष श्री. आशिष सुभेदार, तालुकाध्यक्ष श्री. गुरुदास गवंडे यांच्यासह मनसे तसंच मनविसेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 20 =