श्री सिद्धिविनायक दर्शन घेऊन श्रीसाई दर्शनासाठी शिर्डीला रवाना
महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या राजकारणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून लक्षवेधी भूमिकेत दिसलेले सावंतवाडीचे लोकप्रिय आमदार दीपक केसरकर शुक्रवारी सावंतवाडीतील आपल्या संपर्क कार्यालयात येणार आहेत.
आमदार दीपक केसरकर यांनी आज दादर प्रभादेवी येथील श्री.सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिरातून ते शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले आहेत. गुरुवारी साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहून शिर्डी येथून ते सिंधुदुर्गात येणार आहेत. शुक्रवारी सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटतील. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केसरकर पूर स्थितीचा आढावा घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
राज्याच्या राजकारणात आलेला भूकंप थंड झाल्यावर केसरकर प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत. शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झाल्यामुळे सावंतवाडीमध्ये केसरकरांच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता, परंतु त्या मोर्चात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे शिवसैनिक वगळता सावंतवाडी, दोडामार्ग आदी ठिकाणांच्या केसरकर समर्थकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आमदार केसरकरांच्या शुक्रवारच्या घर वापसीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.