कणकवली :
नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि देवगड पोलीस स्टेशन, विजयदुर्ग पोलीस स्टेशन च्या वतीने देवगड तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती सदस्य, ग्रामसुरक्षा दल यांच्या साठी व्यसनमुक्ती वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत अल्कोहोलिक अनॉनिमस चे प्रतिनिधी संजय यांनी “आजचा दिवस नाही”याप्रमाणे निश्चय केला तर मद्यपाश या आजारातून मुक्त होऊ शकतो. आपल्या परिवारासोबत आनंदाने जीवन जगता येऊ शकते याबाबत आपले अनुभव कथन केले.
नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी तंबाखू पासून ते अमली पदार्थांच्या व्यसनांमुळे कोण कोणते परिणाम दिसून येतात याची सविस्तर माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली.
जिल्हा जिल्हा व्यसनमुक्त समितीच्या देवगड प्रतिनिधी सानिया चौगुले यांनी सापसीडी या खेळाच्या माध्यमातून व्यसनाधीन होण्याचे धोके व त्यापासून बचाव कशाप्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक दिले. शिवाय उपस्थितांना व्यसनमुक्ती वरील ” प्रतिज्ञा “ही शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली.या चर्चेत श्री . मंगेश जाधव होमगार्ड अधिकारी तसेच श्री. गुरुनाथ वाडेकर पोलीस पाटील यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .फार्णे, व्यसनमुक्ती बाबत विचार व्यक्त करताना . म्हणाले असे कार्यक्रम प्रत्येक गावात झाला पाहिजेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे यांनी केले. आभारप्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री . चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात “नशाबंदी मंडळ सांगे , व्यसने नका करु”या अभंगाने झाली , समारोप “बोला आज मिळूनी सारे, निश्चय करूया रे” या व्यसनमुक्तीच्या आरतीने करण्यात आला. शेवटी सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन आपल्या गावात जनजागृती करण्याची मागणी केली.