*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची कथा*
*आकांत …..*
त्या पाच बहिणी व एक भाऊ . या पाचांपैकीच एकीची कहाणी सांगणार आहे मी तुम्हाला. तत्पूर्वी तिच्या आई विषयी
थोडे सांगते. तिच्या पोटी वंशाच्या दिव्या साठी
पाच मुलींना जन्म घ्यावा लागला. तसे तिचे नि माझे वय
जवळ जवळ सारखेच असावे. पण आम्हा दोघींच्या
परिस्थितीत जमिन अस्मानचे अंतर. मी मोठ्या घराण्यात
लाडाकोडात वाढलेली तर ती जन्मदात्या बापाने तिच्या आईसह
तिला माहेरी टाकून दिलेली. १२/१३ वर्षांची होई पर्यंत मामांनी
बहिणीला व भाचीला पोसले,नि आता भाची दुहेरी हाडाची
व उफाड्याची दिसू लागताच तिचे आजोबा वारल्याचे निमित्त
करून त्यांनी बहिणीची ब्याद मुलीसह तिच्या सासरी पोहचवून त्यांनी पोबारा केला.
आता दोघी मायलेकी कुठे जाणार? इतकी वर्ष ही बया माहेरी
होती नि आता अचानक अशी संधी साधून उगवलेली पाहताच
तिच्या सवतीचे तर डोकेच फिरले व ती तिला शिव्याच घालू
लागली.तशी ती सवत शहरात रहात असली तरी तिचे खेड्या
तले घर हिला देणे शक्यच नव्हते. मग मुलीचे काका, जे मोठे
कर्तेसवरते, नावलौकिक ठेवून होते, त्यांनी त्या दोघांनीही
खेड्यातल्या घरात प्रवेश मिळवून दिला. रहायचा तर प्रश्न सुटला
पण दोघांनीही खायचे काय ? भावाने भावाला समजवून
सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही व
प्रकरण कोर्टात गेले नि त्याला पहिल्या बायकोसाठी
खावटी द्यावीच लागली. झाले .. दोन्ही भावात कधी नव्हे ते
या बाईमुळे वितुष्ट आले. मग दोघी ही शेतावर कामाला
जाऊ लागल्या. हो, धान्य म्हणजे खावटी कोर्टाने मंजूर केली
होती,पण नवरा ती ही पूर्ण देत नव्हता.मायलेकी शेतात काम
करून रोजंदारीवर पोट भरू लागल्या.
काकांनी तिचे एक नोकरदार मुलगा पाहून लग्न करून दिले.
नि ती संसाराला लागली व मुलासाठी तिच्या नवऱ्याने पाच
मुली होऊ दिल्या. शेवटी नशिबाने सहावा मुलगा झाला नि
त्याचे गंगेत घोडे न्हाले. मुली मोठ्या होऊ लागल्या. परिस्थिती
चांगली होती. सर्व सुस्थळी पडल्या. राहिला मुलगा तो ही शिकला पण नोकरी काही मिळाली नाही .या पाच मुलींपैकी
शेवटची नंदिनी नावाजलेल्या गावात व शिकल्या सावरल्या
मुलाला दिली.मोठ्या थाटात लग्न झाले. सगळे एकदम खुश
होते. लग्ना नंतर सुरूवातीचे काही दिवस सासरी राहिली व
माहेरपणाला आली. नविन लग्न, डोळ्यात स्वप्न , जे इतर
मुलींचे भावविश्व तेच तिचे ही होते. भावी संसाराच्या स्वप्नात
रंगलेली अशी ती सासरचे केव्हा घ्यायला येतात याची वाट
पहात होती.
कारण “त्याच्या” भेटीची ओढ लागली होती. नि अचानक
सासरचा माणूस आला नि तिला व तिच्या आईलाही घेऊन
गेला. बोलला काहीच नाही.तिला थोडे विचित्र वाटले पण..
बोलली नाही, नवीच होती ना? आणि असं सासरच्या मंडळींशी
कुणी बोलतं का? गप्प बसली व गावात एस टी शिरली.
झपाझपा त्या माणसाच्या मागून दोघी सासरच्या घरात
शिरताच … तिची तर वाचाच बसली. समोरचे दृश्य पाहून
तिचा तिच्याच नजरेवर विश्वास बसेना. तिच्या नवऱ्याचे शव
जमिनीवर पांघरून निपचित पडले होते. तिने हंबरडा फोडला
व गाई सारखी ती हंबरू लागली. एकूण एकांच्या डोळ्यांना
धारा लागून सारे माजघर तिच्या आकांताने हंबरू लागले.
फार भयंकर दिडमूढ करणारा देखावा होता. काय कारण
घडले माहित नाही पण त्याने मागचा पुढचा काही विचार न
करता आत्महत्येचे पाऊल उचलले होते. सारा गाव शोक सागरात बुडाला होता. तिच्या दु:खाला तर पारावारच नव्हता.
कोणाजवळ काही उत्तर नव्हते, असेल तर ते कोणी सांगत
नव्हते.
अंगाची हळदही पुरती न निघालेली ती लगेच विधवा झाली.
तिने असे कोणते पाप केले होते की तिच्या वाट्याला असे
भयंकर दु:ख यावे.सर्व विधी आटोपल्यावर आई वडिल तिला
माहेरी घेऊन आले. ही घटना कळल्या नंतर आम्ही पण सुन्न
झालो होतो. कारण परिचयातील लोक होते ते. आम्ही सांत्वना
साठी जायचे ठरवले व गेलो. त्या प्रसंगाचे शब्दश: वर्णन करणे मला तरी अशक्य आहे. आम्हाला पाहताच घरात जो
आकांत उसळला त्यात सारे घरच वाहून जाते की काय असा
क्षणभर मला भास झाला. आम्ही सारेच कोलमडून पडलो.
अश्रूंना पूर आला. आमच्याकडे खानदेशात बोलून वर्णनात्मक
भाषेत रडण्याची पद्धत आहे. ती जे वर्णन करून आकांत करत
होती, काय सांगू एवढे आम्ही कधी ही रडलो नव्हतो.
तुम्ही का माझ्यावर अन्याय केला अशा प्रेमाने ती साद घालत
होती की ऐकणाऱ्याच्या हृदयाचे पाणी पाणी व्हावे व दगडालाही पाझर फुटावा. तो फार भयंकर प्रसंग मी आज ही
विसरले नाही इतका तो माझ्या मनावर खोलवर परिणाम
करून गेला व मी भयभित झाले. नको देवा! का असे दु:ख
निरपराध्यांच्या पदरी तू घालतोस म्हणून मला देवाचा राग ही
आला पण म्हणून काही परिस्थिती बदलणार नव्हतीच!
आयुष्यात अशा काही अनाकलनीय घटना घडतात की माणूस
सुन्न होऊन जातो व त्याला काही उत्तर न सापडल्यामुळे तो
अधिकच बेचैन होतो. आता ही मनाने मी सारे दृश्य पाहते
आहे नि आता ही मला अश्रू अनावर झाले आहेत .
थांबते…🙏🏼🙏🏼
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि :२९ जून २०२२
वेळ: रात्री: ११ : २२