You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात तालुक्यातील पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित-

वैभववाडी महाविद्यालयात तालुक्यातील पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित-

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने तालुक्यात पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल येथे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन (नॅक NAAC) परिषदेकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. पाणी हे महत्त्वाचे नैसर्गिक स्त्रोत आहे. त्याचे जतन व संवर्धन केले पाहिजे. शासन व विद्यापीठ स्तरावर पाणी संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवले जातात. वैभववाडी शहरात वार्षिक सरासरी चार हजार मि.मी.(४००० मि.मी.) इतका पाऊस पडतो. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था व महाविद्यालयाने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सदर प्रकल्प पाच हजार स्क्वेअर फुट (5000sqft.) इतक्या जागेवर बसविण्यात आला आहे. यातून वार्षिक सरासरी १५ लाख लिटर पाणी बोअरवेलमध्ये भरणा होणार आहे.यामध्ये एकूण चार फिल्टर बसविण्यात आले असून सदर प्रकल्प २ लाख ३० हजार खर्च करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाचा फायदा वैभववाडी परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी श्रीमती स्मिता तावडे व श्री.विलास तावडे यांनी आर्थिक मदत केली आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांनी श्रीमती स्मिता तावडे व श्री.विलास तावडे यांचे आभार मानले आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सहसचिव श्री.शैलेंद्र रावराणे, श्री.संजय रावराणे व श्री.सचिन रावराणे यांचेही सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा