You are currently viewing चौकुळ वनक्षेत्र परिसरात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर

चौकुळ वनक्षेत्र परिसरात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर

ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडू नये, पाळीव प्राण्यांची काळजी घ्या – उपवनसंरक्षक डी.पी.खाडे

सिंधुदुर्गनगरी

मौजे चैकुळ येथील वनक्षेत्र तसेच त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बिबट, वाघ अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांनी रात्रीचे शक्यतो घराबाहेर पडू नये, त्याचबरोबर स्वतःसह प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन उपवनसंरक्षक डी.पी.खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                आंबोली वनपरिक्षेत्र स्थळातील मौजे चौकुळ आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बिबट, वाघ अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल आहे. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर या हिंस्त्र वन्य प्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामस्थांनी रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास गटा गटाने, काठी, तसेच बॅटरी सोबत घेऊन जावे. रात्री कुत्रे जोरजोराने भूंकत असल्यास जवळपास बिबट किंवा वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी आपल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाई, म्हशी, आदी पाळीव जनावरे बंद गोठ्यात ठेवावे.

                बिबट, वाघ हे अनुसूची एक मधील वन्यप्राणी असल्याने या वन्यप्राण्यास इजा करणे, तसेच शिकार करणे हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 89 अन्वये गुन्हा आहे. तसे केल्यास 6 ते 7 वर्षे कारावास व किमान 10 हजार रुपये दंडाची कायद्यामध्ये कलम 51(1) अन्वये तरतूद आहे. तरी ग्रामस्थांनी सतर्क राहून आपल्या स्वतःसह पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्यावी असे श्री. खाडे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा