You are currently viewing मोगरा फुलला

मोगरा फुलला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.प्रतिभा हरणखेडकर यांची अप्रतिम काव्यरचना

वसंतात बागेत माझीया
आला बहर फुलांना
सौंदर्य अन सुगंधाने
घाली भुरळ सा-यांना

हिरव्या कंच रोपट्यावरी
उमटली एक नाजूक कळी
रंगाने गोरीपान पांढुरकी
मुलायम स्पर्शाची तान्ही बाळी

हिरवीगार तलम पाने
जीवापाड तिला जपती
जमल्या सख्या तिच्यासारख्या
वा-यासवे मस्तीत झुलती

चंद्रकिरणाच्या कोमल स्पर्शे
खुलू लागे एक एक पाकळी
अंगोपांगी मोहरून येई
सुंदर मोहक कळी न् कळी

रजनीच्या थंड हवेत
प्राशुनी चांद्रतेजाला
उधळी मंद सुगंध सारा
सारे म्हणती मोगरा फुलला

चांदण्यासम फांदीफांदीवर
गच्च फुलांचा ताटवा बहरे
मंद धुंदसा सुगंध त्याचा
स्वार वा-यावर होउनी पसरे

सुवासाने त्या अवघा
आसमंत घमघमला
जाहले चित्त प्रमुदित
अहाहा मोगरा फुलला

डॉ.प्रतिभा हरणखेडकर
जळगाव,महाराष्ट्र

प्रतिक्रिया व्यक्त करा