देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक; फडणवीस राहणार मंत्री मंडळा बाहेर
महाराष्ट्र राज्यात गेले दहा दिवस चाललेला राजकीय भूकंप अखेर शिवसेनेच्या फुटीरगटाचे नेते माजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन थंडावला. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सेना-भाजप युतीमध्ये लढले होते, परंतु मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून अखेर पंचवीस वर्षांच्या मैत्री दरार आली आणि सेना-भाजप युती तुटली. शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासोबत गठबंधन करून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. परंतु गेल्या अडीज वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनेला मंत्रीमंडळात मिळालेली दुय्यम वागणूक आणि बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन हिंदुत्ववादी तत्व बाजूला राहिली. शिवसेना पक्षाची, आमदारांची सरकारात राहूनही गळचेपी होत होती. एकीकडे सत्ता तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचारांची होणारी मानहानी या चक्रव्यूहात अडकलेले शिवसेनेचे जवळपास 39 आमदार पक्षातून वेगळे होत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. त्यामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन कोसळले.
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर सर्वांनी अटकळ बांधली होती, ती भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “पुन्हा येणार” आणि मुख्यमंत्री होणार, मागील निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येणार” अशी घोषणा केली होती, आणि तेच सत्य होतंय असं जवळपास सर्वांनाच वाटत असतानाच भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार. आणि आज एकमेव एकनाथ शिंदे यांची राज्यपालांच्या हस्ते शपथविधी होणार, असे जाहीर करून महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात खळबळ माजवून दिली. एकनाथ शिंदे ठाण्यातील रिक्षाचालक ते मंत्री हा प्रवास अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला होता, परंतु आनंद दिघे यांच्या छत्रछायेत नेते म्हणून लोकांसमोर आलेले आणि जनतेने प्रेम केलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं कोणीही स्वप्न देखील पाहिलं नव्हतं. परंतु आज गुरुपुष्यामृत योगाच्या या पवित्र दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा शिलेदार बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार पुढे घेऊन जाणारा एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य शिवसैनिक महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसणार हा नक्कीच शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे.
भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा शिवसेनेचे माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करत आपल्याबद्दल लोकांच्या मनात नक्कीच एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला एक मजबूत सरकार देणार अशी ग्वाही दिली आहे, त्याचबरोबर आपण फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगत नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे आपल्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.