You are currently viewing सावंतवाडी मोती तलावातील भिंतीच्या कडेचा खोलवर गाळ काढल्यामुळे फुटपाथ धोकादायकच…!

सावंतवाडी मोती तलावातील भिंतीच्या कडेचा खोलवर गाळ काढल्यामुळे फुटपाथ धोकादायकच…!

सावंतवाडी

सावंतवाडी मोती तलावात गेले अनेक वर्षे साचलेला गाळ काढण्यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. मोती तलावातील पाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच कमी होऊन जायचं, त्यामुळे गाळ काढून सौंदर्य अबाधित ठेवण्याची मागणी नागरिक करत होते. पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेने आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्यातून हॉटेल पर्ल ते कुटीर रुग्णालय सावंतवाडी या परिसरातील तलावातील गाळ काढला. तलावातील गाळ काढणे करिता अवघड असे पोकलेन दोनच वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या फूटपाथवर चढविण्यात आले, व पोकलेन फिरण्यासाठी तलावाच्या काठावरील अनेक पथदिपांची छाटणी केली. पोकलेनच्या साह्याने तलावाच्या संरक्षक भिंतीपासून जवळपास पंधरा फूट रुंदीचा पाच फूट खोलीपर्यंत गाळ काढण्यात आला. तलावातील गाळ काढतेवेळी अवजड पोकलेन फुटपाथ वर चढवून काम केल्यामुळे पोकलेनच्या वजनाच्या दाबामुळे तलावाची संरक्षक भिंत खचली गेली, आणि पावसाळा सुरू होतात फुटपाथसहित संरक्षक भिंत काही ठिकाणी तलावात कोसळली.
सावंतवाडीच्या मोती तलावातील गाळ काढून मोती तलावाचं सौंदर्य अबाधित राखणे हे आवश्यक होतेच, परंतु ज्या पद्धतीने पोकलेनचा वापर करून तलावाच्या कडेचा गाळ काढला तो पाहता तलावाची संरक्षक भिंत धोकादायक बनली होती आणि ती पडणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. सावंतवाडी तलावाच्या बाजूने जाणारा राज्य महामार्ग आणि या महामार्गावरून होणारी प्रचंड वाहतूक पाहता अवजड वाहतुकीमुळे व रस्त्याला होणाऱ्या कंपनांमुळे (व्हायब्रेशन) फुटपाथ हळूहळू खचत गेला व सकाळ-संध्याकाळ तलावासाठी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. अखेरीस काल रात्री फुटपाथचा काही भाग भितिसह कोसळला. तसं पाहता तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी तलावाच्या अंतर्भागात साचलेला गाळ काढणे अत्यावश्यक होते, परंतु मुख्य साचलेला गाळाचा ढीग तलावात अजूनही तसाच असून अनावश्यक असलेला संरक्षक भिंतीच्या शेजारील गाळ काढल्याने तलावाची संरक्षक भिंत कोसळली… आणि तलावाच्या सौंदर्याला बाधा आली. सावंतवाडी नगरपालिकेने तात्काळ तलावात पडलेल्या गाळ उपसून संरक्षक भिंत हॉटेल पर्ल समोरील गणेश विसर्जन केल्या जाणाऱ्या जागेपासून कुटीर रुग्णालयापर्यंत नव्याने उभारणे अत्यावश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा