You are currently viewing सिंधुदुर्ग वासियांना आतुरता आमदार दीपक केसरकर यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची

सिंधुदुर्ग वासियांना आतुरता आमदार दीपक केसरकर यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची

*सिंधुदुर्ग वासियांना आतुरता आमदार दीपक केसरकर यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार, माजी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील होऊन हिंदुत्वाचा व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेऊन एकनाथ शिंदे यांच्या गटाची प्रवक्ते म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. आमदार दीपक केसरकर हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत, सुंदर अशा सावंतवाडी शहरातील शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व. पूर्वीपासूनच सधन असलेल्या श्रीमंत वसंतशेठ केसरकर यांच्या घरात जन्मलेले दीपक केसरकर हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मास आले असे म्हटले जाते.
सावंतवाडी शहराच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक म्हणून सावंतवाडी नगरपालिकेवर गेलेले दीपक केसरकर मंत्री पदापर्यंत पोहोचले. दीपक केसरकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सावंतवाडी शहराचा कायापालट केल्याने त्यांना विकास पुरुष अशी बिरुदावली लागली. आपल्या कार्याच्या जोरावर दीपक केसरकर आमदार म्हणून तब्बल तीन वेळा निवडून येत हॅट्रिक साधली. सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी कारभार पाहिला होता. विधानभवनातील कामकाजाची उत्तम जाण असलेले मराठी, हिंदी, इंग्रजी सहित विविध भाषांवर प्रभुत्व असलेले शांत संयमी तेवढेच आक्रमक, निर्भीड,अभ्यासू नेतृत्व म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे पाहिले जाते. आपल्यावर टीका करणाऱ्यांना शब्दातून उत्तर देण्यापेक्षा आपल्या कार्यातून त्यांचेच शब्द त्यांच्याच घशात घालण्याची ताकद असणारे दीपक केसरकर एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा भारी पडले होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना नेतृत्वाकडून दुर्लक्षित ठेवले गेलेले आमदार दीपक केसरकर पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत शिवसेनेने आघाडी करू नये, याच मताचे होते. सेना-भाजप युती व्हावी आणि युतीचे सरकार यावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला राज्याच्या मंत्रिमंडळात आणि निधी वाटपात दुय्यम स्थान मिळाल्याने नाराज होऊन शिवसेनेचे माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 37 आमदारांसह शिवसेनेचा एक गट वेगळा केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा झालेला शिवसेनेचा गट शिवसेना सोडून गेलेला नसून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे, असे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार अल्पमतात आल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा व विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात भाजप व शिवसेनेतून वेगळा झालेला एकनाथ शिंदे गट, अपक्षांसह नवीन सरकार येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून गटाची ध्येयधोरणे, पुढील वाटचाल, रणनीती इत्यादी मीडिया तसेच महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनी जबाबदारी पेलली होती. एकनाथ शिंदे गटामध्ये आमदार दीपक केसरकर यांच्यावर दिलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी पाहता आणि दीपक केसरकर यांची विधिमंडळ कामकाजाची जाण, मंत्रिपदाचा दांडगा अनुभव यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी नक्कीच सोपवली जाणार याबाबत दुमत नाही. सावंतवाडी शहरातील अभ्यासू नेतृत्व असलेले दीपक केसरकर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून दिसतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपले महत्वपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा जिल्हा वासियांना लागून राहिली आहे. दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून उचललेली महत्त्वपूर्ण जबाबदारी पाहता त्यांना निश्चितच कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दीपक केसरकर विरोधकांचे धाबे दणाणल्याचेही चित्र दिसत आहे. केसरकरांवर उठसूट टीकाटिप्पणी करणारे देखील शांत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दीपक केसरकर यांचा राजकारणात दांडगा अनुभव आहे. ज्याप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून देशाच्या राजकारणात ओळखले जातात, परंतु तळागाळापर्यंत ग्रामीण पातळीवर सुरेश प्रभू यांच्याकडून भरीव असे कार्य जरी घडले नसले तरी देशाच्या राजकारणात हुशार व्यक्ती म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. आमदार दीपक केसरकर हे देखील विधिमंडळ कामकाज आदी बद्दल उत्तम ज्ञान असणारे हुशार नेतृत्व आहे. जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर त्यांच्याकडून भरीव असे कार्य घडले नसले तरीही मंत्रालय पातळीवरून त्यांनी जिल्ह्यासाठी भरघोस असा निधी आणला होता. चांदा ते बांदा योजनेतून जनहिताची कामे सुरू केली होती, रोजगार, उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रयत्न केला होता. महाविकास आघाडी सरकार मधील अजित पवार यांनी सुडापोटी ती योजना बासनात गुंडाळून केसरकर यांच्यावर असलेला राग दाखवून दिला होता. केसरकरांनी भरघोस निधी आणला परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्तेमुळे त्याचा योग्य विनियोग होऊ शकला नाही. नवीन मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आलं तर नक्कीच स्वतःच्या अधिकारात दीपक केसरकर जिल्ह्यासाठी भरीव असे योगदान देऊन जिल्ह्याचा कायापालट घडवून आणतील या अपेक्षेने सिंधुदुर्ग जिल्हावाशीयांना आमदार दीपक केसरकर यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाची आस लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 11 =