लाकडावरील खर्च होणार कमी; पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणार – नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली
कणकवली नगरपंचायतीने सार्वजनिक स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची उभारणी केली आहे. लवकरच या विद्युत दाहिनीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या विद्युत दाहिनीसाठी १४ लाख रूपयांचा खर्च आला आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वजनिक स्मशानभूमीतील लाकडांसाठी प्रतिवर्षी तब्बल ३ कोटी ४५ लाख रूपयांचा खर्च येत आहे. तर १ कोटी ९८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे नगरपंचायतीला दरवर्षी सव्वा कोटीचा जादा खर्च लाकुड फाट्यासाठी येत आहे.
स्मशानभूमीत लाकडाचा वापर होत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडही केली जाते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी गतवर्षी विद्युत आणि गॅस दाहिनी उभारण्याचा ठराव नगरपंचायतीने घेतला होता. यातील विद्युत दाहिनी बांधून पूर्ण झाली आहे. तर भविष्य काळात गॅस दाहिनीचीही उभारणी होणार आहे. विद्युत दाहिनीसाठी १४ लाख रूपयांचा खर्च आला आहे. आता स्मशानभूमीत मृतहेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन आम्ही नागरिकांना करणार आहोत.
विद्युत दाहिनीमुळे लाकडावरील खर्च वाचणार आहे. तसेच लाकूड फाट्यावरील खर्च वाचल्याने वृक्ष तोडही कमी होणार आहे. कणकवली स्मशानभूमीत विद्युत आणि लाकडावरील अशा दोन्ही दाहिनी कार्यरत असणार आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांनाही विद्युत दाहिनीची सक्ती नसून कुठली स्मशानभूमी वापरायची हे ऐच्छिक असणार आहे अशीही माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.