You are currently viewing सिंधुदुर्गातील शाळांना “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” प्रदान…

सिंधुदुर्गातील शाळांना “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” प्रदान…

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छतेची परंपरा आहे. येथील नागरिक, मुले, शिक्षक यांना स्वच्छतेची आवड आहे. शाळा, महाविद्यालयेही सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. यापुढे ही त्यामध्ये सातत्य ठेवून जिल्ह्यातील सर्व शाळांनी पुढील वर्षीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले.

स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १७११ शाळांपैकी १६१० शाळांनी या स्पर्धेत सहभागी दर्शविला होता. सहभाग नोंदविलेल्या १६१० शाळांपैकी ५६६ शाळांना ३ स्टार, ९०८ शाळांना ४ स्टार तर ९५ शाळांना ५ स्टार प्राप्त झाले आहेत. जिल्हास्तर पुरस्कारासाठी ५ स्टार प्राप्त ९५ शाळाची पडताळणी केंद्र प्रमुख, विषयतज्ञ, विशेषतज्ज्ञ व विशेष शिक्षकांमार्फत करण्यात आली. या ९५ शाळांची पडताळणी केल्यावर मूल्यमापन कर्त्यांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार पोर्टल वर ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्हयातील ११ शाळांची निवड केली. या शाळांना आज जिल्हास्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये शाळेतील पाणी, शौचालये हातधुण्याची सुविधा, देखभाल दुरुस्ती, क्षमता बांधणी व कोव्हिडं ( १९ ) तयारी व प्रतिसाद या सहा घटक वर मिळणाऱ्या गुणांवरून म्हणजेच एकूण सर्वाधिक गुणावर ११ शाळाची निवड करण्यात आली. यामध्ये जि. प. शाळा इळये नं.१ ता. देवगड, जि.प.शाळा नाधवडे ब्राम्हणदेव ता. वैभववाडी, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ ता. कुडाळ,

जवाहर नवोदय विद्यालय ता. सावंतवाडी, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चराठे ता. सावंतवाडी, चौकूळ इंग्लिश स्कूल चौकूळ ता. सावंतवाडी, जि.प.शाळा सावंतवाडी नं.४ ता. सावंतवाडी, मदर तेरेसा स्कूल ता. वेंगुर्ले., व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल बांदा ता. सावंतवाडी, एन. एस. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ता. देवगड, जि. प. शाळा बापार्डे नं.१ ता. देवगड या शाळांचा समावेश असून या सर्व पुरस्कार प्राप्त शाळांना आज जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जे. तनपुरे, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा