*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.अचला धारप यांचा अप्रतिम ललीतलेख*
*ऋतू झरला पानापानांतून*
🍀🌱🌿🍃
*”भाव अत्तराचे आज पार कोसळले …*
*थेंब पावसाचे जेव्हा मातीत* *मिसळले…”*
पावसाच्या थेंबात काय जादू असते काय माहित? तप्त झालेल्या धरणीवर तो रीमझीम करत आला की मिलनोत्सुक अवनी जणू पावसाच्या स्वागतासाठी मृदगंधाची कुपी उघडते. वातावरण धुंद होते. अवनीही मोहरते.
पाऊस कधी कधी थेंब थेंब पडतं पडतं डोंगरावरन उड्या मारत टपो-या थेंबाने पडू लागतो. डोंगरातुनं, कडेकपा-यातुन फिरतं फिरतं सगळ्यांना संजीवनी देतं येतो. नव्या नहाळिच पाणी पिऊन सारी सृष्टी चैतन्यमय होते…धरतीच्या गर्भातुन कोंब रुजू लागतात…
झाडांच्या फांद्यामधुन कोवळी पोपटी पाने हळुच त्यांच अस्तित्व दाखवु लागतात.. हलु लागतात..गार वा-याबरोबर डोलु लागतात..
हसतात..मस्ती करतात..जणुकाही तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या एखाद्या कुमारीके सारखी!बघता बघता ही पाने हिरवीगार होतात…यौवनाने रसरसलेल्या एखाद्या तरुणीसारखी!
पाऊस आणि प्रेम यांचे एक वेगळेच नाते आहे. वर्षा ॠतु म्हणजे जणू प्रेमसरीत न्हाऊन जायचाच ॠतू!
कालिदासांनी पण त्यांच्या मेघदूत काव्यात वर्णन केलयं की पत्नीच्या विरहात असलेला यक्ष साक्षात मेघाला दूत बनवुन त्याच्या प्रियसीला निरोप पाठवतो.
*ऋतू झरला पानापानांतुन*
*प्रियकर, प्रेयसीच्या मनामनांतुन*
हा पानापानांतुन झरलेला ऋतू प्रियकर प्रेयसीच्या मनात प्रेमऋतू फुलवतो. मग तरुणाई बेधुंद होऊन या झिम्माड पावसाची मजा लुटायला कुठल्या तरी धबधब्यावर, रानोमाळी एकांतात जाते.
प्रेयसीच्या बटांवरचा पावसाचा थेंब तिला खुलवून टाकतो…
तिचे ते रुप न्याहळे पर्यंत तिला चिंब भिजवून टाकतो.
तिचे ते सचैल रुप न्याहळे पर्यंत ती पण लाजून चुर होते. हाय! हाय !मग करकमळे आपोआपच कमरे पर्यंत जाऊन तिही अलगद मिठीत येते.तो ओठांवरचा मोत्यासारखा थेंब तृषार्थ प्रियकर प्रेयसीची जणू तहान भागवण्याची वाट बघत असतो.
पाऊस तसा *रोमॅण्टिकच*!
*पाऊस झरला पानापानांतून*
*रसिक होऊन प्रेयसीच्या बटांतून*
*रंगेल होऊन प्रेयसीच्या अधरातून*
*प्रियकराला भुल पाडतं रोमारोमातुन*
सौ. अचला धारप, रोहा.