You are currently viewing दोडामार्ग-आडाळी ग्रामपंचायतीने घेतला “विधवा प्रथा बंदी” चा ठराव…

दोडामार्ग-आडाळी ग्रामपंचायतीने घेतला “विधवा प्रथा बंदी” चा ठराव…

दोडामार्ग

तालुक्यातील आडाळी ग्रामपंचायतीने “विधवा प्रथा बंदी” चा ठराव घेतला आहे. तर याच माध्यमातून यासंदर्भात समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. तर असा निर्णय घेणारी आडाळी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्व गावातून ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद असे ठराव घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र या अनिष्ट प्रथेचा पगडा समाजात एवढा आहे की अद्यापही मोठ्या प्रमाणात असे ठराव होताना दिसत नाहीत. आडाळी ग्रामपंचायतने मात्र प्रथम मासिक सभेत विधवा प्रथा निर्मूलनसाठी जनजागृती करून ग्रामसभेत ठराव घेण्यासाठी प्रयत्न करावेत असा ठराव घेतला. सरपंच उल्का गांवकर ग्रामपंचायत सदस्य पराग गांवकर, विशाखा गांवकर, पुंडलिक गांवकर, संजना खरात, ग्रामसेवक नम्रता राणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून २० जूनला ग्रामसभा आयोजित केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

सभेला पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यां डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, निवृत्त शिक्षिका मुर्ती कासार, कल्पना तेंडुलकर आदीनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. स्त्रीला सौभाग्य हे तिच्या जन्मापासूनच मिळालेल असतं. पतीच्या निधननंतर तीच सौभाग्य विधवा प्रथेमुळे समाजाकडून हिरावून घेतलं जात. जन्मापासून तीला मिळालेल सौंदर्य हिरावून घेऊन तीला विद्रूप करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आधुनिक काळात स्त्री सबला म्हणून वावरत असताना या प्रथेला समाजातून नष्ट करायला हवे, असं मत उपस्थितानी मांडल.

पराग गांवकर यांनी ग्रामपंचायतची भूमिका मांडताना सांगितले की, बालविवाह, सतीची चाल प्रथा कालऔघात नष्ट झाल्या. मात्र त्यासाठी दंडशक्ती म्हणजे शासन व्यवस्था व समाजातील विवेकशक्ती म्हणजे समाज सुधारक यांनी मिळून प्रयत्न केले. मात्र महिलांचा समाजातील सन्मान हिरावून घेणारी अनिष्ट अशी विधवा प्रथा आजही सुरु आहे. आज ग्रामसभेने ठराव घेतला म्हणून ती लगेच बंद होणार नाही, मात्र या ठरावमुळे या प्रथेला स्वेच्छेने झुगारू इच्छीणाऱ्या महिलांना ठरावामुळे नौतिक बळ मात्र निश्चितच मिळेल. या प्रथेला गावात मूठमाती देण्यासाठी जनजागृती कारण्यासाठी ग्रामपंचायत निश्चितच प्रयत्न करेल.

यावेळी ग्रामसेवक नम्रता राणे यांनी गावातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलन करणे व त्यासाठी जनजागृती करणे याबाबतचा ठराव मांडला. उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून एकमुखाने ठरवाला पाठिंबा दिला.

असा ठराव घेणारी आडाळी ही तालुक्यातील पाहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेसाठी मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी ऍड. संदीप निंबाळकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा