You are currently viewing सावंतवाडी शहरातील शांत संयमी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर

सावंतवाडी शहरातील शांत संयमी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर

संवाद मिडिया टीम चा मतदार संघात संवाद…

वाचा सावंतवाडी मतदार संघातील बोलक्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक आलेल्या भूकंपाने महाविकास आघाडीचे गेली अडीच वर्षे महाराष्ट्रात असलेले सरकार अडचणीत आले. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या जवळपास ३९ व अपक्ष अकरा आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये आसरा घेतला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आमदार बंडखोरी करून गेले,त्यात पत्रकारांना सामोरे जाण्यासाठी बंडखोर शिवसेना गटाचे प्रवक्ते म्हणून आम.दीपक केसरकर यांच्यावर खास जबाबदारी देण्यात आली. दीपक केसरकर यांची अभ्यासू वृत्ती, हुशार व शांत संयमी स्वभाव याची उत्तम पारख असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर आपल्या गटाची मते मांडण्याची मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे आमदार दीपक केसरकर एकनाथ शिंदे गटाचा हुकमी एक्का समजला जाऊ लागला. शिवसेना बंडखोर गटातून दीपक केसरकर हेच गेला आठवडाभर मीडियाशी बोलत असून बंडखोर गटाच्या मागण्या अगदी व्यवस्थितपणे शिवसेना पक्षप्रमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवत असल्याने सावंतवाडी शहरातील शांत संयमी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा जोमाने पुढे आलेले दिसून येत आहे.
कोकणातील दबंग नेतृत्व म्हणून गेली तीन दशके माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ओळखले जाते. आपल्या निर्भीड आणि परखड व्यक्तिमत्त्वातून नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. आक्रमक नारायण राणे यांच्या नेतृत्वावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेल्या सावंतवाडी शहरातील शांत संयमी आमदार दीपक केसरकर यांनी मात केली. आपली मधाळ गोड वाणी आणि जनतेच्या काळजाला हात घालण्याची त्यांच्या अंगी असलेली ताकद यामुळे दीपक केसरकर यांनी जनतेच्या मनात घर केलं आणि जिल्ह्यात नारायण राणे यांच्या विरोधात दहशतवाद या मुद्यावर लढले. त्यामुळे नारायण राणे यांचे राजकारणातील स्थान डळमळीत झाले आणि त्यांना निवडणुकीत दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रतिभा असूनही दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली गेली नव्हती. त्यामुळे दीपक केसरकर आणि त्यांचे समर्थक नाराजच होते. महाविकास आघाडी सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्व सत्तास्थाने आपल्या ताब्यात ठेवून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिल्याने नाराज झालेले पक्षाचे आमदार बंडखोरी करून सरकार मधून बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले.
शिवसेना पक्षातून बंडखोरी करून बाहेर पडलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे मंत्री आमदार व अपक्ष आमदार सुरत मार्गे गुवाहाटी येथे गेले व भाजप प्रणित राज्यात त्यांनी आसरा घेतला. एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप बरोबर सरकार स्थापन करावे अशी मुख्य मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करत मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण केला. या सर्व घडामोडींमध्ये सावंतवाडीचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळात सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले शांत संयमी हुशार अभ्यासू नेतृत्व दीपक केसरकर यांनी प्रमुख भूमिका वटविल्याचे एकंदरीत दीपक केसरकर यांच्या शिंदे गटांमध्ये असलेल्या वावरातून दिसून येते. एकनाथ शिंदे यांनी मुंबई सोडल्यानंतर गुवाहाटी येथे गेल्यावर आठवड्याभरात पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे जाताना नेमक्याच शब्दात उत्तर देत आपल्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हेच आपल्याला सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतील, असे सांगून दीपक केसरकर शिंदे गटासाठी किती महत्त्वाचे आहेत हेच दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांच्यावर सोपवलेली प्रवक्ते पदाची जबाबदारी ज्या ज्या वेळी दीपक केसरकर मीडियासमोर येऊन किंवा आभासी माध्यमांद्वारे सामोरे जातात आणि त्यांना विधिमंडळ कायद्याचे असलेले ज्ञान याद्वारे पत्रकारांना योग्य आणि समर्पक अशी उत्तरे देतात यावरून दीपक केसरकर यांचा विधिमंडळातील दांडगा अभ्यास दिसून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर यांच्या बंडखोरीच्या विरोधात सावंतवाडी शहरांमध्ये मोर्चा काढला होता परंतु या मोर्चामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सावंतवाडीतील शिवसैनिक वगळता सावंतवाडी शहर, तालुका व सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला मतदार संघातील शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
संवाद मीडियाच्या टीमने सावंतवाडीतील शिवसेनेची रॅली संपल्यावर सावंतवाडी मतदारसंघात सर्वसामान्य लोकांशी आणि काही कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष व फोनवर संवाद साधला त्यावेळी कार्यकर्ते व नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकू आल्या. आमचो दीपकभाई राज्याच्या राजकारणात चमाकलो… वाडीचा नाव झाला… नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना मोठे केल्यानी.. दीपक भाईन कार्यकर्त्यांका मोठे करूक नाय… पण दगडापेक्षा विट मऊ म्हनान आम्ही भाई सोबत. अशी प्रतिक्रियाही सर्वसामान्य लोकांमधून ऐकू आली….. निवडणूकीत आम्ही भाई साठी प्रचार केलो.. तेंची पत्रका वाटली.. भाई मंत्री झाले तेव्हा…बघल्यानी तरी न बघितल्यासारखे करीत… मंत्री झाल्यावर आम्ही भाईंवर नाराज होतो.. भाईंचो स्वभाव साधो.. आम्ही आता नाराज नाय..
आमच्या भाईंका केव्हा पण कॉल करा उचलतात.. कामात असले तर परत कॉल करतात.
भाईंका आम्ही केव्हा पण भेटा शकतो….. मंत्री झाल्यावरच भाई आमका भेटत नव्हते…
भाईना भेटाचा असला तर पदाधिकारी यांची गरज नाय… आम्ही तेंका केव्ह्याही कॉल आणि भेटा शकतो.
भाईंकडून आमका मान सन्मान मिळता
अशा प्रकारच्या बोलक्या प्रतिक्रिया, सामान्य नागरिक, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी संवाद मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या गैरसोयींमुळे अनेक गंभीर रुग्णांना गोवा बांबुळी येथील गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी जावे लागते गोवा बांबुळी रुग्णालय अनेक रुग्णांना आमदार दीपक केसरकर यांचा आधार मिळतो. कित्येकाना तर उपचारासाठी देखील दीपक भाई स्वतः पैसे देतात. “भाईंच्यामुळे आम्ही विमानाने प्रवास केला, वर्षातून एकदा भाई आम्हाला पर्यटन सफर घडविण्यासाठी विमानाची तिकीट आणि खर्चाला पैसे द्यायचे” अशा प्रकारची बोलकी प्रतिक्रिया एका पत्रकाराने सुद्धा दिली. प्रत्येक माणसाच्या बद्दल प्रत्येकाची मतमतांतरे असली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात दीपक भाई केसरकर आजच्या घडीला तरी एक शांत संयमी हुशार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून राजकीय पटलावर दिमाखात चमकत असल्याचे दिसत आहे. भविष्यात दीपक भाईंकडून मतदार संघातील आणि तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या असतील याबद्दल शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा